Antilia Bomb Scare: मनसुख हिरेनच्या हत्येसाठी ४५ लाखांची सुपारी; NIA चा दावा

Mansukh Hiren

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Murder) धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी तब्बल ४५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने मंगळवारी विशेष न्यायालयात ही माहिती दिली आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणात (Antilia Bomb Scare) महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबई येथील घराबाहेर २५ फेब्रुवारीला जिलेटीनच्या कांड्या भरलेली एक कार सापडली होती. त्यानंतर ज्यांच्या ताब्यात ही कार होती त्या मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. ५ मार्चला हिरेन यांचा थेट मृतदेहच आढळून आला. दरम्यान, NIA ने हिरेन यांच्या हत्येसाठी ४५ लाखांची सुपारी दिली होती, असा दावा केला आहे. त्याशिवाय, या प्रकरणात अटक झालेले आरोपी अत्यंत खतरनाक असल्याचं एनआयएचे वकील सुनील गोन्साल्विस यांनी सांगितलं. ४ ते ५ साक्षीदारांना धमकी दिली गेली असल्याने ते पुढे येत नाहीत, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे, असा दावाही वकिलांनी केला.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास करताना सचिन वाझे यांच्यासोबत सतीश, मनिष आणि प्रदीप शर्मा यांचा सहभाग स्पष्ट झाला. सतीश आणि मनिष यांनी मनसुख हिरेनची हत्या केल्याची कबुली दिली. सचिन वाझे आणि प्रदीप शर्मा यांच्या आदेशानेच त्यांनी मनसुख हिरेनची हत्या केली. हत्येनंतर दोघांनी प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे यांच्याशी संपर्क साधला होता. या हत्येसाठी दोघा आरोपींना रोख रक्कम देण्यात आली होती, असा दावा एनआयएच्या वकिलांनी याआधी केला होता.