मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. गुरुवारी पोलीस व्हॅनचा एक व्हिडीओ शेअर करून, निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकिटे पुरवली जात आहेत? असा सवाल त्यांनी केला होता. तर आता, सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा एक व्हिडीओ शेअर करत, ‘गृहखात्याची अवस्था कोणीही यावं आणि टपली मारून जावं…,’ अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
हेही वाचा – शरद पवार-अजित पवारांच्या भेटीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले – “त्यावर मला भाष्य करायचे नाही.”
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली होती. फडणवीस यांना लोक चाणक्य म्हणतात. मला ते पटत नाही. कारण चाणक्याने माणसे घडवायची असतात. शरद पवार यांनी हसन मुश्रीफ, अजित पवार, छगन भुजबळ यांना घडवले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवले? त्यांनी कुणालाच घडवले नाही, त्यांनी फक्त जमवले, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली होती. त्याच्याबरोबरीनेच ड्रग्जमाफिया ललित पाटील प्रकरणात देखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे.
गृहखात्याची अवस्था कोणीही यावं आणि टपली मारून जावं अशी झाली कधी कुख्यात गुन्हेगार गुंड पोलिसांना तालावर नाचवतात तर कधी सरकार दरबारचे मंत्री सरेआम इज्जत काढतात.. !! @Dev_Fadnavis@TanajiSawant4MH@OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm #Fail_homeminister pic.twitter.com/OALf3Vng6F
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) November 10, 2023
तर, कालच (गुरुवारी) पुण्याच्या जेल रोड येथील पोलीस व्हॅनचा एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली…,’ अशी कॅप्शन त्याला दिली आहे. एक पोलीस व्हॅन उभी असून, तिच्या आडोशाला पोलीस काही व्यक्तींशी बोलत आहेत, तसेच त्यांच्याकडून काहीतरी घेत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. यावर, कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जनस्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
हेही वाचा – मोदी ओबीसी असल्याचे सांगतात मात्र…; जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींचा निशाणा
तर, आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याला आजच ऑर्डर काढा सांगताना, मी मुख्यमंत्र्यांचे असले काही ऐकत नसल्याचे तानाजी सावंत म्हणताना व्हिडीओत दिसत आहेत. गृहखात्याची अवस्था कोणीही यावे आणि टपली मारून जावे, अशी झाली कधी कुख्यात गुन्हेगार गुंड पोलिसांना तालावर नाचवतात तर कधी सरकार दरबारचे मंत्री सरेआम इज्जत काढतात…, अशी खोचक टिप्पणी सुषमा अंधारे यांनी या व्हिडीओवर केली आहे.