छत्रपती शिवरायांच्या विरोधात बोलणार असाल तर खपवून घेणार नाही, सुप्रिया सुळेंचा इशारा

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली. त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. छत्रपती शिवरायांच्या विरोधात बोलणार असाल तर खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसोबत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातले आहेत. तुमचे हीरो तुम्हाला इथेच मिळतील, असे सांगत त्यांनी या तीन नेत्यांचा उल्लेख केला. त्यावरून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, राजशिष्टाचार लक्षात ठेवून आम्हाला राज्यपाल कोश्यारी यांच्याबद्दल बोलता येणार नाही. पण कोणताही राजशिष्टाचार नसल्याने ते मात्र काहीही बेफाम आणि पदाला न शोभणारे बोलतात.

भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांना हा इतिहास नेमका कोणी सांगितला. त्यांनी जे सांगितले, तसा इतिहास कोणी वाचला का? आमच्या वाचनात तो कधीच आला नाही, असे सांगून सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे लोक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलू शकतात, पण आम्ही छत्रपतींबद्दल आता ऐकून घेणार नाही, असा थेट इशाराच सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

सांभाळून वक्तव्य करा, भुजबळांचा राज्यपालांना सल्ला
राज्यपाल कोश्यारी अशी वक्तव्ये का करत आहेत, हे समजायला मार्ग नाही. अन्य राज्यात असे वक्तव्य कोणी केले असते तर, ते राज्य पेटून उठले असते. पण महाराष्ट्र हे खूप सहनशील राज्य आहे. येथे राज्यपालांचा मान राखला जात आहे. त्यामुळे राज्यपालांनी देखील विचारपूर्वक सांभाळून विधाने करावीत, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिला. शिवाजी महाराज जुने झाले असतील तर, मोदींना त्यांची प्रतिमा होर्डिंगवर लावून ‘सबका साथ, सबका विकास, छत्रपतींचा आशीर्वाद’ असे का लिहावे लागते?, असा सवालही भुजबळांनी केला.