घरमहाराष्ट्रराजे रजेवर! 'महानगर'च्या वृत्तामुळे विधान भवनात खळबळ

राजे रजेवर! ‘महानगर’च्या वृत्तामुळे विधान भवनात खळबळ

Subscribe

आत्राम यांच्या गैरहजेरीचे वृत्त संपूर्ण अधिवेशनात मंगळवारी गाजले. विरोधकांसह सत्ताधार्‍यांमध्ये दिवसभर याच वृत्ताची चर्चा होती आणि प्रत्येकाच्या नजरा राजे अंबरीश आत्राम यांचाच शोध घेत होत्या. विशेष म्हणजे या वृत्तानंतर राज्य सरकारमधील सगळेच मंत्री एकदम सावध झाले आणि सर्वांनी विधान भवनात हजेरी लावली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘गायब’ असलेले वन आणि आदिवासी कल्याण राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम दै.‘आपलं महानगर’मधील वृत्तामुळे मंगळवारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी तातडीने स्वतःच्या रजेचा अर्ज विधिमंडळ कामकाज मंत्र्यांकडे पाठवला. आत्राम यांच्या गैरहजेरीचे वृत्त संपूर्ण अधिवेशनात मंगळवारी गाजले. विरोधकांसह सत्ताधार्‍यांमध्ये दिवसभर याच वृत्ताची चर्चा होती आणि प्रत्येकाच्या नजरा राजे अंबरीश आत्राम यांचाच शोध घेत होत्या. विशेष म्हणजे या वृत्तानंतर राज्य सरकारमधील सगळेच मंत्री एकदम सावध झाले आणि सर्वांनी विधान भवनात हजेरी लावली. आत्राम गैरहजर असल्याच्या वृत्ताचे विरोधी पक्षांच्या आमदारांनी जोरदार स्वागत केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यालयात तर वृत्ताचे सामूहिक वाचन करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार अब्दुल सत्तार यांनी वृत्ताचे कौतुक करताना ज्यांना सभागृहात येता येत नाही, त्यांना काढून टाकले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेचे आमदारही या वृत्ताचे समर्थन करत होते. मंत्री सभागृहात येतात म्हणजे ते राज्यातील जनतेवर उपकार करत नाहीत. कामकाजात भाग घेणे हे मंत्र्यांचे कर्तव्यच आहे. या कर्तव्यापासून जे दूर जात असतील, त्यांना मंत्री म्हणून राहण्याचा अधिकारच नाही, असे शेकापचे विधान परिषदेतील ज्येष्ठ आमदार जयंत पाटील म्हणाले. सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही राजे यांच्या गैरहजेरीच्या वृत्ताला सकारात्मक प्रतिसाद दिला. एका आमदाराने तर राजेंना मंत्री का केले याचेच आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर म्हटले.

तुम्ही कान उपटले, ते बरे झाले!

विधिमंडळाच्या दैनंदिन कामकाजात भाग न घेणारे राजे अंबरीश आत्राम हे एकच मंत्री नाहीत. असे अनेक ‘राजे’ या सरकारमध्ये आहेत. या मंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत आम्ही अनेकदा मुख्यमंत्र्यांना सांगितले. पण त्यांनाही कोणी दाद देत नाही, हे या राजांनी दाखवून दिले. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाच्या कामकाजात अनेकदा खंड पडतो. कामकाज थांबवले जाते. यामुळे मोठे नुकसान राज्याला सोसावे लागते, याचेही मंत्र्यांना काही वाटत नाही. मुख्यमंत्री आणि विधिमंडळ कामकाज मंत्र्यांना सांगून सांगून आम्ही दमलो. तुम्ही सरकारचे कान उपटले ते बरे झाले.
अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री

- Advertisement -

 

सांगूनही आमच्याकडे दुर्लक्ष करतात

सभागृहात मंत्र्यांनी थांबले पाहिजे, यासाठी सरकारच्यावतीने प्रत्येक अधिवेशनापूर्वी मंत्र्यांना सूचित केले जाते. नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी विशेष बैठक बोलावून सगळ्या मंत्र्यांना त्यांच्या उपस्थितीविषयी आम्ही जाणीव करून दिली होती. मंत्री वा राज्यमंत्र्यांनी कुठल्याही परिस्थितीत परवानगी घेतल्याविना विधान भवन सोडू नये, अशी अपेक्षा असते. दुर्दैवाने काहीजण याकडे दुर्लक्ष करतात.
-गिरीष बापट, संसदीय कार्यमंत्री

- Advertisement -

रजेचा पहिलाच अर्ज

विधिमंडळ कामकाज मंत्रालयाकडे विचारणा केली असता राजे सत्यवान महाराज यांच्या पुण्यतिथीला अहेरी येथे जातो, असे पत्र देऊन राजे अंबरीश आत्राम गेल्याचे सांगण्यात आले. राजे यांचे हे पहिलेच रजेचे पत्र असल्याचे या मंत्रालयातील एका अधिकार्‍याने सांगितले.


प्रवीण पुरो – नागपूर

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -