घर उत्तर महाराष्ट्र 'पीआय'पदी बढती होण्याआधीच एपीआयने घेतली लाच; 'जीएसटी' अधिकारीही जाळ्यात

‘पीआय’पदी बढती होण्याआधीच एपीआयने घेतली लाच; ‘जीएसटी’ अधिकारीही जाळ्यात

Subscribe

नाशिक : तक्रारदाराविरुद्ध गुन्हा न दाखल करण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्विकारताना रविवारी (दि.३) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने अभोणा पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपायास अटक केली. विशेष म्हणजे, सहायक पोलीस निरीक्षकाची पोलीस निरीक्षक पदी बढती होणार होती. तरीही, त्याने बेकायदेशीर मार्गाने कारवाया करून पैसे लाटण्याचा धडाका लावला. गेल्या ५ दिवसांत गुटखा व अवैध गूळ, नवसागर विक्रेत्या व्यापार्‍यांना कारवाईचा बडगा दाखवून मोठी माया सहायक पोलीस निरीक्षकाने जमवली असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.

सहायक पोलीस निरीक्षक नितीन जगन्नाथ शिंदे (वय ३९, रा. गणेशनगर, अभोणा, ता. कळवण), पोलीस शिपाई कुमार गोविंद जाधव (४२, रा. अभोणा पोलीस ठाणे वसाहत, ता. कळवण, जि. नाशिक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नितीन शिंदे व कुमार जाधव यांची अभोणा पोलीस ठाण्यात नेमणूक आहे. तक्रारदाराविरुद्ध अभोणा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रार अर्ज चौकशीमध्ये गुन्हा दाखल न करण्याच्या मोबादल्यात सहायक पोलीस निरीक्षक शिंदे व शिपाई जाधव यांनी शनिवारी (दि.२) तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. अभोणा पोलीस ठाण्यात तक्रारदाराकडून रविवारी (दि.३) १० हजार रुपये स्विकारताना पथकाने शिपाई जाधव यास अटक केली. याप्रकरणी अभोणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीएसटी अधिकारी 40 हजारची लाच घेताना जाळ्यात

- Advertisement -

जाहिरात चित्रीकरणासाठी आलेली वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून सोमवारी (दि.४) स्विकारताना राज्यकर अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. जगदीश सुधाकर पाटील (वय 39, रा. फ्लॅट क्र. ९०२, एफ विंग, अनमोल नयनतारा सिटी दोन, फेज-2, कर्मयोगी नगर, नाशिक) असे अटक केलेल्या राज्यकर अधिकार्‍याचे नाव आहे. जगदीप पाटील हे वस्तू व सेवा कर कार्यालय, नाशिकमधील वर्ग दोनचे राज्यकर अधिकारी आहेत. तक्रारदारांचा जाहिरात चित्रीकरणाचा व्यवसाय आहे. जाहिरात चित्रीकरणाचे कामात व्यत्यय येऊन तक्रारदारांचे पाच ते सहा लाखाचे आर्थिक नुकसान होऊ नये, चित्रीकरणासाठी आलेले वाहने जीएसटीचा दंड न भरता सोडून दिल्याच्या मोबदल्यात जगदीश पाटील याने तक्रारदाराकडे सोमवारी (दि.४) ४० हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिककडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. तक्रारदाराकडून ४० हजारांची लाच स्विकारताना पथकाने जगदीश पाटील यास अटक केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -