घरताज्या घडामोडीएपीएमसीचे सभापती अशोक डक यांचा राजीनामा

एपीएमसीचे सभापती अशोक डक यांचा राजीनामा

Subscribe

नवी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी आज राजीनामा दिला आहे. राज्याच्या पणन संचालकांनी सभापती डक यांचा राजीनामा मंजुरही केला आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला दणका देणे सुरू केले आहे. बाजार समितीच्या सभापतींच्या राजीनाम्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने एपीएमसीकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसत आहे. बाजार समितीच्या सभापतीपदी शिंदे समर्थकाची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. हिवाळी अधिवेशनानंतर रिक्त जागेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अडीच वर्षापासून अशोक डक सभापती होते. ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कालावधी त्यांचा पूर्ण झाल्यामुळे त्यांनी पनण संचालक पुणे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला असल्याचे डक यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील त्या त्या विभागातील एपीएमसी संचालकांचे तेथील पद रद्द झाल्याने संचालक म्हणून अपात्र ठरले आहेत. मुंबई एपीएमसीसह सहा विभागातून निवडून आलेल्या १८ संचालकांपैकी ७ संचालकांचे पद रद्द झाले होते. यामध्ये माधवराव जाधव (बुलडाणा), धनंजय वाडकर (भोर, पुणे),बाळासाहेब सोळसकर (कोरेगाव, सातारा),वैजनाथ शिंदे (लातूर), प्रभू पाटील (उल्हासनगर ठाणे), जयदत्त होळकर (निफाड नाशिक), अद्वय हिरे (नाशिक) यांचा समावेश आहे.

- Advertisement -

७ पद रद्द झाले होते तसेच सभापती अशोक डकसह तीन जणांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आली होती. यादरम्यान मे महिन्यात आघाडी सरकारने संचालक पद रद्द केलेल्या निर्णयाला पणन मंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली होती. ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये सुनावणी घेण्यात येणार होती. परंतु काही कारणामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून हिवाळी अधिवेशनानंतरच होईल अशी माहिती समोर आली होती.

मात्र या दरम्यान सुनावणी होण्याआधीच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी पणन संचालकांना आज दुपारी आपला राजीनामा पाठवला. राजीनामा पणन संचालकांनी मंजूर केल्याने सभापती पद रिक्त झाले आहे. शिंदे फडणवीस यांच्या मर्जीतील कुणाची वर्णी लागणार हे हिवाळी अधिवेशनानंतर स्पष्ट होणार आहे.

- Advertisement -

एपीएमसीच्या सभापती पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्याजागी बदलापूरमधील शिंदे समर्थक प्रभू पाटील आणि महादेव जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.


हेही वाचा : मेंढपाळांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणार – सुधीर मुनगंटीवार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -