एपीएमसी निवडणुक, राज्यात मतदानाला सुरूवात

सहा महसूल विभागात प्रत्येकी दोन शेतकरी प्रतिनिधी, पाच मार्केटमधील प्रत्येकी एक व्यापारी प्रतिनिधी, एक कामगार प्रतिनिधी अशी १८ जणांची मतदानाने आज निवड होईल

apmc 1
एपीएमसी निवडणुकीला उत्साहात सुरूवात

राज्यातील ३०५ बाजार समिती व ६२५ उपमार्केटची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारा समितीच्या निवडणुकीसाठी मतदानाला आज सकाळपासूनच सुरूवात झाली आहे. या निवडणुकीत सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. राज्यातील सर्वात घाऊन बाजारपेठेच्या संचालक मंडळाची निवडणुक म्हणून अनेक पक्षातील बड्या नेत्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने नशीब आजमावण्याची संधी आहे. राज्यातील सहा महसुली विभागांतून बारा शेतकरी प्रतिनिधी या समितीच्या संचालक मंडळावर निवडून येणार आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षातील बड्या राजकीय नेत्यांनी या निवडणुकीसाठी तयारी केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एक जनहित याचिकेमुळे राज्य सरकारला एपीएमसी संचालक मंडळाची निवडणूक घेणे क्रमप्राप्त झाले आहे. सहकार विभागाच्या मार्फत ही संपुर्ण निवडणूक राबवली जात आहे. ही निवडणुक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवत आहे. तर भाजपने या निवडणुकीत लक्ष केंद्रीत केले असले तरीही त्यांना पॅनेल तयार करता आले नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी मिळून पॅनेल तयार केले आहे.

अशी आहे निवडणुक प्रक्रिया…

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकुण २७ संचालक असतात. सहा महसूल विभागात प्रत्येकी दोन शेतकरी प्रतिनिधी, पाच मार्केटमधील प्रत्येकी एक व्यापारी प्रतिनिधी, एक कामगार प्रतिनिधी अशी १८ जणांची मतदानाने आज निवड होईल. यात कांदा बटाटा लसूण, भाजी, फळ, धान्य आणि मसाला बाजारातून प्रत्येकी एक संचालक राहणार असून या बाजारात गेली अनेक वर्षे काम करणारे माथाडी, हमाल, कामगारांमधून एक संचालक निवडला जाणार आहे. या पाचही बाजारांवर महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटनेचे वर्चस्व आहे. सहा महसुली विभागांतून बारा शेतकरी संचालक म्हणून निवडून येणार असून यासाठी स्थानिक पातळीवर जिल्हा नेते या निवडणुकीत उतरणार आहेत. पाच संचालक हे राखीव संवर्गातून राज्य शासनाकडून नियुक्त केले जाणार असून दोन संचालक हे मुंबई व नवी मुंबई पालिकेमधून नियुक्त होणार आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांनी जय्यत तयारी केली आहे.संपूर्ण राज्यभर निवडणुकीची यंत्रणा रावबिली जात आहे.सहा महसूल विभागमधून 12 शेतकरी प्रतिनिधी व बाजार समितीमधून पाच व्यापारी प्रतिनिधी व एक कामगार प्रतिनिधी निवड मतदानाने करायची आहे.

अशी आहे मतदानाची तयारी …

प्रत्येक महसूल विभागातून 2 सदस्यांची निवड केली जाणार असून त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यलयात मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. एकूण 34 जिल्हयामध्ये मतदान घेतले जाणार असून व्यापारी प्रतिनिधीची निवड करण्यासाठी मुंबई एपीएमसीत अतिरिक्त भाजीपाला मार्केट,दाना मार्केट,कांदा बटाटा मार्केट व मसाला मार्केटमध्ये मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. मुंबई बाजार समितीच्या व्यापारी प्रतिनिधी निवडण्यासाठी अडते,व व अ वर्ग खरिदारांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. एकूण 10 हजार 957 मतदार असून यांपैकी फळ व कामगार मतदारसंघातील निवड बिनविरोध झाली असल्याने येथील 2,524 जणांची मतदान होणार नाही. उर्वरित 16 सदस्यांची निवड करण्यासाठी 8433 मतदार मक्तदानाचा हक्क बजावणार आहेत.सर्वात कमी 281 मतदार कोंकण महसूल विभागात असून सर्वात जास्त 1,799 मतदार भाजीपाला मार्केट मतदारसंघात आहेत.