आप्पा, शिकायत का मौका तुम्हे नही मिलेगा, बविआला मिळणार मंत्रिपद?

गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला शिंदे आणि ठाकूर यांच्यातील संघर्ष मिटण्याच्या मार्गावर असून नव्या सरकारमध्ये बविआला मंत्रीपद मिळण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास बविआला मिळालेले हे पहिलेच मंत्रीपद असेल.

आम्ही कुणाच्या दावणीला बांधलेले आमदार नाही, असे सभागृहातच खडे बोल सुनावणार्‍या आमदार हितेंद्र ठाकूर यांची खास दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. ’आप्पा, शिकायत का मौका तुम्हे नही मिलेगा!,’ अशा शब्दात नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांना आश्वस्त केले आहे. विधानसभेतील विश्वासदर्शक ठरवादरम्यान झालेल्या समारोप भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष करून आमदार हितेंद्र ठाकूर यांचा आप्पा असा उल्लेख केला. तर क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील यांचेही खास नाव घेतले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला शिंदे आणि ठाकूर यांच्यातील संघर्ष मिटण्याच्या मार्गावर असून नव्या सरकारमध्ये बविआला मंत्रीपद मिळण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास बविआला मिळालेले हे पहिलेच मंत्रीपद असेल. (Appa, you will not get a chance to complain, BVA will get minister)

हेही वाचा – अमित शहा, उद्धव ठाकरे पोस्टरवरून गायब, चर्चा तर होणारच!

मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून आमदार हितेंद्र ठाकूर व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यातील वैर वाढले होते. एकनाथ शिंदे यांना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. यानिवडणुकीत युतीचे उमेदवार असलेल्या राजेंद्र गावित यांच्यासमोर बविआच्या बळीराम जाधव यांचे आव्हान होते. या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी गावित यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे निवडणूक चिन्ह गोठवण्यापर्यंत एकनाथ शिंदे यांनी मजल मारली होती. याचे परिणाम म्हणून बहुजन विकास आघाडीला पराजयाचा सामना करावा लागला होता.

विधानसभा निवडणुकीतही शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नालासोपारा, बोईसर व वसई मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून आव्हान उभे केले होते. बोईसरमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे यांनाच शिवसेनेत आणले होते. वसईत काँग्रेसच्या विजय पाटील यांना आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर उभे केले होते. तर नालासोपारा मतदारसंघात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितीज ठाकूर यांच्यासमोर पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उमेदवारी देऊन कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे क्षितिज ठाकूर यांचा विजय आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकरता स्वतःच्या विजयापेक्षा प्रतिष्ठेचा होता. बहुजन विकास आघाडीच्या इतिहासात प्रथमच अशी आव्हानात्मक स्थिती एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी उभी केल्याने आमदार हितेंद्र ठाकूर यांची या दोघांवर प्रचंड नाराजी होती.

हेही वाचा – ‘ईडी’चे सरकार, पण ‘एडी’च्या तीन वर्षांत तीन भूमिका; सर्वच अचंबित

त्यात भरीस भर म्हणून वसई-विरारच्या प्रशासकीय राजवटीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बहुजन विकास आघाडीची प्रशासकाच्या माध्यमातून कोंडी केली होती. याच काळात बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेतील दरी प्रचंड वाढली होती. याबाबत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वेळोवळी नाराजी व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे सरकार आपल्याला विकासनिधी देत नाही म्हणून आमदार हितेंद्र ठाकूर यांची तक्रार होती. तशी खंत त्यांनी माध्यमातूनही व्यक्त केलेली होती. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत सेना उमेदवाराच्या विरोधात भाजपला मतदान करून ठाकूरांनी आपली नाराजी उघडही केली होती. त्यानंतर शिंदे यांच्यावरही संतापही व्यक्त केला होता.

या पार्श्वभूमीवर नव्या सत्ता समीकरणात मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे बहुजन विकास आघाडीला कशी ’ट्रीटमेंट’ देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, हे सरकार सामान्य लोकांचे सरकार असून सामान्य लोकांच्या हितासाठी काम करेल. कोणत्याही आमदाराला विकासनिधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देऊन सर्व आमदारांची मने जिंकली आहेत. समारोप भाषणाअखेर विशेष करून आमदार हितेंद्र ठाकूर यांचा त्यांनी ’आप्पा’ असा उल्लेख करतानाच; ’शिकायत का मौका तुम्हे नही मिलेगा, असे जाहीर आश्वासनही दिले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निकटचे संबंध असलेल्या हितेंद्र ठाकूरांनी शिवसेनेशी सुरु असलेल्या संघर्षातून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपला साथ दिली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भाजपची सत्ता येण्याची चिन्हे दिसताच आमदार क्षितीज ठाकूर यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बविआचे तीनही आमदार सोबत असल्याची ग्वाही दिली होती. गेली तीन दशके आमदार असलेल्या ठाकूर मंत्रीपदापासून कायम वंचित राहिले होते. यावेळी मात्र स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच ठाकूरांना मंत्रीपद देण्याची तयारी केली आहे. पण, ठाकूरांनी त्याला नकार देत क्षितीज ठाकूरांना मंत्री बनवण्याचा मानस व्यक्त केला आहे.

दरम्यान, दोन आमदार असलेले बच्चू कडू कॅबिनेट मंत्रीपदासाठी आडून बसले आहेत. एक आमदार असलेल्या मनसेलाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंसोबत बंडखोरी केलेल्यासोबतच भाजपसोबत असलेल्या काही अपक्षांनाही मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर तीन आमदार असलेल्या बविआलाही किमान राज्यमंत्रीपद मिळेल असे सांगितले जाते.