घरनवी मुंबईश्री सदस्यांच्या मृत्यूनंतर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

श्री सदस्यांच्या मृत्यूनंतर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची या घटनेवरील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (16 एप्रिल) खारघर येथील भव्य सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र सरकारतर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं असून या सोहळ्यासाठी आलेल्या १३ श्री सदस्यांचा मृत्यू झालाय. हा सोहळा भर उन्हात पार पडला, यात उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्माघात यामुळे साधारण १०० जणांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. मात्र दुर्दैवाने यातील ११ जणांचा रूग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर २५ जणांवर अद्यापही उपचार सुरू आहे.

दरम्यान, या दुःखद घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांप्रमाणेच धर्माधिकारी कुटुंबावरही शोककळा पसरल्याचं चित्र आहे. या घडलेल्या घटनेनंतर धर्माधिकारी कुटुंबाकडून दुखवटा पाळण्यात आला. पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील घरासमोरील रांगोळी पुसण्यात आली आहे. तसंच आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराबाहेर असलेली फुलांची आरासही हटविण्यात आली. याशिवाय समाज माध्यमांवर येणाऱ्या प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणाही सतर्क झाली असून धर्माधिकारी यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: ‘त्या’ ११ जणांचा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू, मृतांचा आकडा १३ वर

त्यानंतर आता डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची या घटनेवरील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. उष्माघातामुळे श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणानंतर काही काळ डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. या घटनेनंतर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. अखेर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने एक निवेदन सादर करून यावरील आपली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

- Advertisement -

“महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी खारघरमध्ये आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्या कुटूंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्याच्या कुटंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे.”, असं या निवेदनात म्हटलंय.

Maharashtra Bhushan

हे ही वाचा: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात मरण पावलेले श्रीसदस्य कोण आहेत?

उष्माघातामुळे श्री सदस्यांच्या मृत्यूनंतर डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी निशब्द झाले आहेत. या घटनेनंतर ते दुखवटा पाळणार असून पुढील दोन दिवस कोणत्याही श्री सदस्यांना भेटणार नाहीत, असंही सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -