घरमहाराष्ट्रविधान परिषदेसाठी शिवसेेनेत मोठी चुरस

विधान परिषदेसाठी शिवसेेनेत मोठी चुरस

Subscribe

विधान परिषदेत राज्यपाल नियुक्तीने जाणार्‍या बारा सदस्यांमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी सत्तेतील तिन्ही पक्षांकडून आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यापैकी प्रत्येकाच्या वाट्याला चार-चार जागा येणार असून सगळ्यात जोरदार स्पर्धा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे. त्यात सुनील शिंदे, सचिन अहिर, यांच्यासह मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण, अर्जुन डांगळे यांच्या नावांचीही चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीत युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासाठी आपला हुकमी मतदारसंघ सोडून देऊन सुनील शिंदे यांनी ठाकरे परिवारातील पहिल्या ठाकरेंना विधिमंडळात जाण्यासाठी वाट मोकळी करुन दिली. सुनील शिंदे यांना आपली जागा सोडावी लागली ही गोष्ट सामान्य कार्यकर्त्यांच्या फारच जिव्हारी लागली होती. मात्र ‘मातोश्री’ शिंदेंचा यथोचित सन्मान करेन, असे आश्वासन स्थानिक शिवसैनिकांना निवडणुकीवेळी देण्यात आले होते. मात्र आदित्य ठाकरे आमदार झाल्यावर वरळीतल्या ‘भाऊ गर्दीत’ शिंदे मागे पडत असल्याने सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता आहे. यातून वाट काढण्यासाठी आदित्य यांच्यासाठी विधानसभेचा त्याग करणार्‍या शिंदे यांना यादीत पहिली पसंती आहे. तर वरळी विधानसभेत शिंदे यांच्याकडून पराभूत झालेले सचिन अहिर हे आदित्य यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यांनाही आमदारकीचे जोरदार वेध लागले आहेत. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या अहिर यांची वर्णी युवासेना प्रमुखांच्या कोट्यातून लागू शकते.

- Advertisement -

पण त्याचवेळी सूरज चव्हाण किंवा राहुल कनाल यांच्या नावाचे वारेही युवासेनेत वाहताना दिसत आहेत. यापैकी सेनेतील अनेक पदाधिकारी-नेते सूरज चव्हाण यांच्या पारड्यात आपले मत टाकत आहेत. शांत, संयमी स्वभाव, आदित्य निष्ठा, तंत्रप्रेमी, सामान्य शिवसैनिक या चव्हाण यांच्या जमेच्या बाजू आहेत. आदित्य ठाकरेंच्या मैत्री व्यतिरिक्त हॉटेल व्यावसायिक राहुल कनाल यांचे पक्षात विशेष काही योगदान नाही. आदित्य यांच्या आग्रहाखातर याआधी प्रियांका चतुर्वेदी यांना राज्यसभा देण्यात आली आहे. आता विधान परिषदेत पुन्हा तोच प्रकार झाल्यास पक्षांतर्गत नाराजी वाढू शकते. त्यामुळे चारपैकी एक जागा आदित्य यांच्या मर्जीसाठी राखीव असेल. त्यात अहिर, चव्हाण, कनाल यापैकी कोण बाजी मारणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेसह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे ती मुख्यमंत्री ठाकरे याचे खासगी सचिव, पक्ष सचिव आणि ओएसडी मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची. गेल्या 25 वर्षांत आपल्या हातून अनेकांना एबी फॉर्म वितरित करणार्‍या नार्वेकर यांची यंदा तरी वर्णी लागते का, हा औत्सुक्याचा विषय आहे. उध्दव ठाकरे यांना ‘हिरो’ बनवताना स्वत: खलनायक ठरलेल्या नार्वेकर यांना याआधीच संधी मिळायला हवी होती, असे सेनेच्या निरीक्षकांचे म्हणणे आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ‘गुड बूक’ मध्ये भाजपच्या नेत्यांइतकेच स्थान मिळवण्याचे कसब नार्वेकर यांनी गेल्या काही काळात दाखवले आहे. त्याचा थेट फायदा मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापासून पक्षाच्या अनेक कामात झाला आहे. काही वैयक्तिक निकटवर्तीयांच्या भेटी-गाठी घेतानाही कोश्यारी यांनी नार्वेकर यांना सोबत ठेवण्याच्या प्रकाराने तर बडे भाजप नेते बुचकळ्यात पडले आहेत. आता राज्यपाल नियुक्तांच्या यादीतून ते परिषदेत जाणार की पुन्हा ‘वेटिंग’मध्ये राहणार हाच प्रश्च आहे. आदित्य यांच्याशी सूर जुळवणं जड असल्याने नार्वेकरांना आमदार करुन अलगद वेगळ्या वाटेने जाऊ देण्याची रणनीती ‘मातोश्री’ याचवेळी अवलंबून घेईल. त्यासाठी नार्वेकर यांच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वावराचा आधार क्रीडासंघटक म्हणून घेण्याचाही विचार सुरू करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रमुख नावाबरोबरच रामदास आठवले यांना सोडून आलेले दलित कवी, साहित्यिक आणि सोशल इंजिनिअरिंगचे अभ्यासक अर्जुन डांगळे, सातार्‍याचे शिवव्याख्याते नितीन बानगुडे-पाटील, रावसाहेब दानवेंचे विरोधक अर्जुन खोतकर यांच्या नावांचीही चर्चा आहे. यापैकी डांगळेंच्या रुपाने दलित चेहरा देऊन त्यांना मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न विशेषत: ग्रामीण भागासाठी करण्यात येणार आहे. तर शिवव्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांना संधी देऊन सातार्‍यासह पश्चिम महाराष्ट्रात सेना डरकाळी फोडण्याच्या प्रयत्नांना लागली आह

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांना विधान परिषदेत पाठवण्याचा शब्द मागच्या दोन विधानसभांपासून पक्षप्रमुखांकडून दिला जातोय. त्यांच्यासाठी नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आग्रही आहेत. म्हस्के सध्या ठाण्याचे महापौर आहेत. ही सबब पुढे करण्यात आली आहे. त्यावर विधान परिषदेत जाण्यासाठी ठाण्याचे महापौरपद सोडायलाही ते तयार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -