भिवंडीत अपयशी ठरलेल्या प्रवीण आष्टीकरांची नाशिक पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी

भिंवडीत करोनाचा संसर्ग वाढत असताना तेथील महानगरपालिका प्रशासन त्यास आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आता नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Pravin Ashtikar

भिंवडीत करोनाचा संसर्ग वाढत असताना तेथील महानगरपालिका प्रशासन त्यास आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आयुक्त प्रवीण आष्टीकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आता नाशिक महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
बुधवारी (दि.२४) यासंदर्भातले आदेश पारित करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून हे पद रिक्त होते. या पदावर विजय सोनकांबळे आणि संदीप नलावडे हे प्रभारी म्हणून कामकाज पाहत आहेत. मात्र आता या पदावर प्रवीण आष्टीकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने या दोघा अधिकार्‍यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे. आष्टीकर यांनी २५ जून रोजी पदभार स्विकारत शासनाचा अहवाल सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तर भिवंडीतील आयुक्तांच्या जागी नाशिक येथील कळवणचे उपविभागीय अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालेगावात करोनाचे वाढता प्रादुर्भाव पाहता पंकज आशिया यांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी चांगली कामगिरी बजावली असल्याने भिवंडीत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान नाशिक महापालिका लेखाधिकारीपदी नुकतीच महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भिवंडीत अपयशी, मग नाशिकमध्ये नियंत्रण कसे आणार?

करोना विषाणू संसर्ग नियंत्रणाच्या कामकाजाचे गांभीर्य व निकड लक्षात घेऊन त्याबाबतच्या उपायोजनांचा भाग म्हणून आष्टीकर यांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आल्याचे शासन आदेशात म्हटले आहे. नाशिक शहरातही करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकांसह महापालिकेतील तब्बल १८ कर्मचारी करोनाने बाधित आहेत. अशा परिस्थितीत करोनावर नियंत्रण आनण्यासाठी सक्षम अधिकार्‍याची नाशिकला गरज असताना भिवंडीत अपयशाचे धनी बनलेले अष्टीकरांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्तपदी करुन साध्य काय होणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

बदलीसाठी आमदारांनीही केली होती मागणी

प्रवीण आष्टीकर यांनी सप्टेंबर २०१९ पूर्वी पिंप्री चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कामकाज केले होते. त्यानंतर त्यांची भिवंडीत आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. भिवंडीतील त्यांच्या कार्यकाळात झालेले आर्थिक निर्णय वादग्रस्त ठरल्याबाबत त्यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आमदार रईस शेख व राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदन देऊन मागणी केली होती.