घरताज्या घडामोडीमोठी बातमी! मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

मोठी बातमी! मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

Subscribe

मुंबईः राज्य सरकारकडून पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिलेल्या संजय पांडेंना बढती देण्यात आलीय. संजय पांडेंची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीय. तर त्यांच्या जागी मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त असलेल्या हेमंत नगराळेंची बदली केलीय. त्यांना राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारने संजय पांडे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केलीय. ते मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची जागा घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे सोमवारीच पदभार स्वीकारू शकतात. त्याचवेळी विद्यमान पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची बदली करण्यात आलीय. “संजय पांडे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची बदली करण्यात आली आहे,” अशा आशयाचं निवेदनही महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलंय.

- Advertisement -

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंची कारकीर्द

1986 च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी असून, त्यांनी आयआयटी कानपूरमधून आयटी कॉम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलंय. पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम केले. त्यानंतर मुंबईत डीसीपी रँकचे अधिकारी झाले. 1992-93 दंगलीच्या वेळी कृष्णा आयोगाच्या अहवालात चांगल्या कामाचा उल्लेख करण्यात आलाय. मुंबईतील 4 हायप्रोफाईल पोलीस स्टेशनचे 8 झोन बनवण्यात आले होते, त्याचे पहिली डीसीपी बनण्याचा मान संजय पांडे यांना मिळाला होता.

- Advertisement -

1998 मध्ये शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, तिथे पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1999मध्ये एसपीजी असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षेत तैनात होते. 2001 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेले, अखेर कोर्टातील लढ्यानंतर 2011 पुन्हा सेवेत रुजू झाले. 2015 मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले. त्यानंतर 9 एप्रिल 2011 संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. अखेर आता त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागलीय.

संजय पांडेंचे पोलीस महासंचालक कारकिर्दीतील 9 महिन्यांतील 9 निर्णय

राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी एप्रिल 2021 मध्ये पोलीस महासंचालकपदाची सूत्रे सांभाळल्यापासून काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. त्यामध्ये महिलांची ड्युटी 8 तास करण्याचा निर्णय हा अतिशय धाडसी निर्णय मानला जात आहे.

– एसआरपीएफ जवानाची जिल्ह्यातून बदलीची 15 वर्षांची अट 12 वर्षे करण्यात आली
– मागील नऊ महिन्यात 15 हजार नवीन पोलीस भरती
– विनाकारण निलंबित शेकडो कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतले
– कॉन्स्टेबल टू पीएसआय पदोन्नती देण्याचा प्रस्ताव
– वर्षातील 20 दिवस पोलिसांना किरकोळ रजा देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळासमोर घेण्यात आला
– पोलिसांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आणली
– घर बांधणीसाठी 300 कोटींचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर
– कोणत्याही कर्मचाऱ्याला पोलीस महासंचालकांना थेट भेटण्याचा पर्याय
– कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांकडे थेट गृह विभागाचा पाठपुरावा

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी सहावीपर्यंतचे आपले शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतर त्यांनी नागपूर येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण घेतले. नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. तसेच त्यांनी फायनान्स मॅनेजमेंट विषयात आपले मास्टर्स केलंय. तसेच ते 1987च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही आपली सेवा बजावली.

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. तर 1992 ते 1994 या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते. 1992च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यस्थेची स्थिती उत्तमरीत्या हाताळली आहे. 1994 ते 1996 या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी हाताळलं.

1996 ते 1998 मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी आणि गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली. 1998 ते 2002 या काळात नगराळे यांनी सीबीआयसाठी मुंबई आणि दिल्लीतही आपली सेवा बजावली आहे. सीबीआयच्या सेवेत असताना बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, हर्षद मेहताचा घोटाळा अशा अनेक प्रकरणांच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


हेही वाचा : Mumbai Fire : कांजूरमार्गमधील एनजी रॉयल पार्क इमारतीमध्ये भीषण आग


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -