तुनिशा आत्महत्याप्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती

अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्याप्रकरणी राज्य सरकारकडून संजय मोरे यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी शिझान खानच्या जामीन अर्जावर होणाऱ्या सुनावणीसाठी संजय मोरे वसई कोर्टात आले होते.

वसई : अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्याप्रकरणी राज्य सरकारकडून संजय मोरे यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्यात आली. शुक्रवारी शिझान खानच्या जामीन अर्जावर होणाऱ्या सुनावणीसाठी संजय मोरे वसई कोर्टात आले होते. मोरे यांनी कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितल्याने कोर्टाने आजची सुनावणी रद्द करत सोमवारी सुनावणी घेतली जाईल, असे सांगितले. त्यामुळे शिझान खानच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Appointment of special public prosecutor in Tunisha suicide case)

तुनिशा शर्मा आत्महत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या शिझान खानने जामीनासाठी वसई कोर्टात धाव घेतली आहे. शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार होती. सुनावणीसाठी राज्य सरकारने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकिल संजय मोरे उपस्थित राहिले होते. त्यांनी कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितली. ती मान्य करत जिल्हा सत्र न्यायाधिश आर. डी. देशपांडे यांनी सोमवारी सुनावणीची तारीख दिली. त्यामुळे शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. यावेळी शिझान खानचे वकिल शैलेंद्र मिश्रा आणि तुनिशाच्या कुटुंबाचे वकिल तरुण शर्मा कोर्टात हजर होते.

सोमवार सुनावणी होणार असून त्यावेळी सरकारी वकिलांसह तुनिशाच्या वतीने तरुण शर्मा युक्तीवाद करतील. तर शिझान खानच्यावतीने वकिल शैलेंद्र मिश्रा त्याची बाजू मांडणार आहेत. सुनावणीत होत असलेला विलंब आणि आता राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलाची केलेली नियुक्ती यामुळे शिझान खानच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.
तुनिशा शर्मा आत्महत्याप्रकरणी वालीव पोलिसांनी ५२४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

पोलिसांनी अतिशय चांगला तपास केला असून अनेक धक्कादायक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पुढच्या सुनावणीत ते कोर्टापुढे आल्यानंतर शिझान खानच दोषी आहे, हे दिसून येईल, अशी माहिती तुनिशाचा मामा पवन शर्मा याने पत्रकारांशी बोलताना दिली.


हेही वाचा – Big Breaking : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारची मंजुरी