जितेंद्र आव्हाडांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण; ३ मार्चपर्यंत निकाल ठेवला राखून

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी महेश आहेर यांचा आवाज आहे अशी माहिती समोर आली. त्यानंतर आहेर यांना महापालिकेच्या गेटवर मारहाण करण्यात अली. याप्रकरणी आज ठाणे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद पूर्ण झाला असून याबाबतचा निकाल ३ मार्चपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.

Arguments on Jitendra Awhad's bail application completed

वादग्रस्त महापालिका अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दिलेल्या तक्रारीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कट रचून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कार्यकर्त्यांमार्फत मारहाण झाल्याचे नमूद केले. या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्या अर्जावरील दोन्ही बाजूचा युक्तिवाद मंगळवारी (ता. २८ फेब्रुवारी) पूर्ण झाला. मात्र त्याचा निकाल येत्या ३ मार्चपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे.

डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपविण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केले, अशी ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी महेश आहेर यांच्या आवाजातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या मागील गेट क्रमांक ४ च्या बाहेर बेदम मारहाण केली. याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघांना नौपाडा पोलिसांनी अटक केली. यानंतर आव्हाडांवर अटकेची टांगती तलवार होती. त्यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जमीन अर्ज केला. त्यावेळी त्यांना अंतरिम जमीन मंजूर झाला होता. या जामीन अर्जावर मंगळवारी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद पूर्ण केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने तो निकाल येत्या ३ मार्चपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे ३ मार्चपर्यंत आव्हाड यांना दिलासा मिळाला असून त्याचदिवशी त्यांना अटक होणार की जामीन मंजूर होणार हे पाहावे लागणार आहे.

राष्ट्रवादीच्या ‘त्या’ चार पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर
महापालिका सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची कथीत ऑडीओ क्लिप वायरल झाल्यानंतर आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मारहाण करण्यात आली. त्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादीचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी आणि विंशीत गायकवाड यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्या चौघांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मंगळवारी जामीन मंजूर करण्यात आला आहे.


हेही वाचा – “१०० बापांची पैदास नसेल, तर…” भास्कर जाधव यांचे मोहित कंबोज यांना आव्हान