घरमहाराष्ट्रArogya Vibhag Bharti 2021: आरोग्य भरती परीक्षा केंद्रांवर नियोजनाचे वाजले तीन तेरा;...

Arogya Vibhag Bharti 2021: आरोग्य भरती परीक्षा केंद्रांवर नियोजनाचे वाजले तीन तेरा; पुणे, नाशिकमधील विद्यार्थी संतापले

Subscribe

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आज राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र ही परीक्षा सुरु होण्यापूर्वीच पुणे, नाशिक सारख्या जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रांवर नियोजनाचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील आझम कॅम्पस येथील एका परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी सकाळी १० ची वेळ असतानाही त्याठिकाणी पर्यवेक्षक आणि परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेळेवर पोहोचल्या नव्हत्या. परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक आले नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर नाशिकमधील परीक्षा केंद्रावरही गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावरुन आरोग्य विभागाच्या भरती परीक्षांचा गोंधळ काही थांबवण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट होतेय.

पुण्यात विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण

पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजमध्ये परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक वेळेवर पोहचले नाही, त्यामुळे पेपर द्यायला उशीर झाला. या परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या तर काहींना मिळाव्याच नाहीत. त्यामुळे परीक्षेला उपस्थिती विद्यार्थ्यांनी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाविरोधात रोष व्यक्त केला. आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. सिंधुदुर्ग, बीड अशा अनेक जिल्ह्यांमधून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचले होते. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, दोन दोन वेळा परीक्षेला यावं लागतयं. तीन हजार खर्चून आम्ही परीक्षेसाठी आलोय. मात्र किती वेळा या गोंधळाचा सामना करायचा. असं म्हणाले आहेत.

- Advertisement -

नाशिकमध्येही परीक्षा केंद्रांवर गोंधळाची स्थिती

नाशिकमधील काही केंद्रांवर पेपर मिळाले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. नाशिकमधील गिरणारे केबीएच महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावरही गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे परीक्षांचे नियोजन करणाऱ्या व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. तसेच प्रश्न पत्रिका घेऊन येणाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

विलंब झालेला वेळ विद्यार्थ्यांना वाढवून मिळेल- आरोग्यमंत्री राजेश टोपे

तांत्रिक अडचणीमुळे आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितलं. या गोंधळामध्ये जेवढा वेळ विलंब झाला तेवढा वेळ विद्यार्थांना वाढवून मिळेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.


पर्यवेक्षकाच्या चुकीमुळे दोन उमेदवारांसाठी ‘नीट’ परीक्षा पुन्हा घ्या, हायकोर्टाचा आदेश


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -