‘न भूतो न भविष्यति’ अशी दसरा मेळाव्याची तयारी करा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

दादरच्या शिवाजी पार्कात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच पत्रकार परिषद घेत राज्यभरातील शिवसैनिकांना शिस्तीने आणि वाजत-गाजत येण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक करण्याबाबत शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याची माहिती मिळते. आजपर्यंत झाला नाही असा दसरा मेळावा भरवण्याकरिता पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाकरे गटाची जय्यत तयारी

  • शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे.
  • विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे.
  • शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे.
  • दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात शिवसैनिकांच्या स्वागतासाठी विशेष गेट उभारण्यात येणार आहे.
  • उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी स्क्रीन दादर आणि आजूबाजूच्या परिसरात लागणार आहे.
  • दादर-प्रभादेवी परिसर भगवामय करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

यंदा कार्यकर्त्यांच्या या रेकॉर्ड ब्रेक गर्दीतूनच ठाकरे आणि शिंदे गट आपली ताकद दाखवताना, शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहेत. शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीची लढाई न्यायालयात जिंकल्यानंतर शिवसेनेला अखेर मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. यानंतर आता शिवसैनिक दसरा मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत. शिवसेनेने २० हजार रुपये अनामत रक्कम भाडे भरुन दसरा मेळाव्यासाठी मैदान आरक्षित केले आहे.


हेही वाचा – उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान