ठाण्यातील व्हिजनरी परफॉरमिंग आर्ट्सच्या कलाकारांचे मुख्यमंत्री शिंदेंकडून कौतुक

मुंबई : भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या झालेल्या चित्ररथांच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने (Maharashtra Chitrarath 2023) सर्वांचे लक्ष वेधले होते. या चित्ररथातील सहभागी व्हिजनरी परफॉरमिंग आर्ट्सच्या कलावंतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी या कलावंतांचे कौतुक केले.

दिल्लीच्या कर्तव्यपथावर 23 चित्ररथांचे संचलन झाले. यामध्ये 17 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश आणि सहा विविध मंत्रालये व विभागांच्या माध्यमातून देशाच्या भौगोलिक आणि समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविण्यात आले होते. महाराष्ट्राबरोबरच आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचे चित्ररथ होते.

‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेवर आधारित राज्याचा चित्ररथ होता. कोल्हापूरची आंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्त‍िपीठे तर, वण‍ीची सप्तशृंगी हे अर्धे शक्त‍िपीठ आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला. तर चित्ररथाला देण्यात येणाऱ्या बेस्ट पीपल्स चॉईस अवॉर्ड्समध्ये या सदस्यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. या चित्ररथात योगदान असलेल्या ठाण्यातील कळवा खारेगाव येथील व्हिजनरी परफॉरमिंग आर्ट्सच्या सदस्यांनी रविवारी मुख्यमंत्री शिेंदे यांची भेट घेतली.

यासोबतच संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत या सदस्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत नृत्याची आवड जोपासणाऱ्या या मुलांनी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे, या शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा – बारावी परीक्षेतील गणिताच्या पेपरफुटीप्रकरणी मुंबईतील तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल