मुंबईः नेता असो की अभिनेता सर्वच जणांनी मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा सोशल मीडियावर दिल्या. या सर्वांमध्ये दिवसभर चर्चेत राहिल्या त्या डॉन अरुण गवळीने दिलेल्या खास शुभेच्छा. विशेष म्हणजे ज्ञानेश्वरीचा दाखला देत अरुण गवळीने मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्ञानेश्वरांनी गुढी या शब्दाला चार वेळा ज्ञानेश्वरीत स्थान दिले आहे. या चारही ओव्या वेगवेगळ्या अध्यायांत आहेत. साहजिकच माऊलींनी या शब्दाची योजना त्यांच्या समृद्ध साहित्यात केल्याने त्याला सौभाग्य प्राप्त झाले आहे. पण नेमका त्या शब्दाची योजना कशी केली आहे हे आपण बघुया, असे सांगत अरुण गवळीने चारही अध्यायाची ओळख करुन दिली आहे.
अधर्माची अवधी तोडी | दोषांची लिहिली फाडी |
सज्जनांकरवी गुढी | सुखाची उभवी ||
भक्तांचा कैवार घेऊन भगवंत जेव्हा सगुण साकार होऊन अवतरतो तेव्हा त्याच्याकरवी संपूर्ण अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. जगताचा पालन करता जगन्नाथ इथे अधर्माचा शेवट करितो, पापांचा जमाखर्च फाडून टाकितो आणि साधुपुरुषांच्या करवी भक्तीचा प्रसार करवून सर्वत्र सुखाच्या गुढ्या उभारतो. इथे गुढी हा शब्द सौख्यप्राप्ती आणि धर्माची विजयपताका म्हणून योजला आहे, अशी पहिल्या अध्यायाची मांडणी अरुण गवळीने सोशल मीडियावर केली आहे.
ऐके संन्यासी तोचि योगी | ऐसी एकवाक्यतेची जगी |
गुढी उभविली अनेगी | शास्त्रांतरी ||
संन्यास आणि योग यातील मूळ प्राप्तीचा उद्देश हा भिन्न नसून एकच आहे असे भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगतात. संन्यासी आणि योगी हे दोघेही एकाच परमतत्वाकडे मार्गस्थ असतात. आणि हे नुसते बोलणे नाही तर, या एकवाक्यतेचा झेंडा शास्त्रांच्या आधारे अनेक साधकांनी लोकांत मिरविला आहे; हे सत्य किती प्रस्तुत आहे हे सांगताना श्रीमहाराज आम्हाला पुन:श्च एकदा विजयाची संज्ञा म्हणून गुढी शब्दाची योजना करतात.
आजची चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नववर्षाची पहिली तिथी आपण श्रीज्ञानेश्वरीच्या ह्या चार ओव्यांनी समृद्ध करुया, ही गुढी सदैव आम्हाला भक्ती आणि समर्पणाची विजयपताका म्हणून उभारता यावी हीच या सकल संताच्या चरणी प्रार्थना.
सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, अशी पोस्ट टाकत अरुण गवळीने गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चारही ओव्यांचे विश्लेषण या पोस्टमध्ये अरुण गवळीने केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -