एक तरफ बेईमान, एक तरफ निष्ठावान…; अरविंद सावंतांची शिंदे गटावर टीका

Arvind Sawant

राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाले असून शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटातून जय्यत तयारीला सुरूवात झाली आहे. दोन्ही गटांतून मेळाव्याचा टीझर आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांसह समर्थकांमधील उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, एक तरफ बेईमान, एक तरफ निष्ठावान, अशा प्रकारचं ट्वीट करत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर टीका केली आहे.

अरविंद सावंतांचं ट्वीट काय?

अरविंद सावंत यांनी ट्वीट करत शिंदे गटावर लाचार, बेईमान, कचरा अशी टीका केली आहे.
एक तरफ लाचार
एक तरफ सदाचार,
एक तरफ बेईमान
एक तरफ निष्ठावान,
एक तरफ दसरा
एक तरफ कचरा,
बिके हुये क्या जाने निष्ठा
गुमराह कर रहे खाकर विष्ठा !, असं ट्वीट अरविंद सावंत यांनी केलं आहे.

दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटातून जोरदार तयारी सुरू असून वांद्रे-कुर्ला संकुलात शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. परंतु शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी एक लाख खुर्च्यांची व्यवस्था आहे, तर शिवसेनेच्या शिवाजी पार्कमधील मेळाव्यात ४० हजार खुर्च्या असतील, असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.

शिवाजी पार्क मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतरच मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण करावे, अशी शिंदे गटाची योजना आहे. म्हणजे ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देता येईल. त्यामुळे या मेळाव्यातून दोन्ही गट काय साध्य करणार किंवा काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


हेही वाचा : नार्वेकरांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याकडे कोणतीही माहिती नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट