घरताज्या घडामोडीअमित शाह म्हणजे गजनी पण उद्धव ठाकरे रामशास्त्री बाण्याचे, अरविंद सावंतांचा घणाघात

अमित शाह म्हणजे गजनी पण उद्धव ठाकरे रामशास्त्री बाण्याचे, अरविंद सावंतांचा घणाघात

Subscribe

भाजप केंद्रीय यंत्रणांचा राजकीय वापर करत आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना – भाजप युतीवरुन पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा २०१९ निवडणुकीत भाजपने मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केलंय. यावरुनच अरविंद सावंत यांनी पुन्हा टीका केली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली. सोमवारी अरविंद सावंत यांनी अमित शाहांना गजनी सारखा झटका येतो असे म्हणत अमित शाह म्हणजे गजनी असल्याचे म्हटलं आहे. शिवसेना माजी खासदार अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र डागल्यामुळे राजकीय वर्तुळात आगामी काळात भाजप-शिवसेनेची पुन्हा युती होण्याची चर्चा रंगू लागली होती परंतु अरविंद सावंतांनी भाजपवर टीका केली आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत माथेरानमध्ये एका पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी अरविंद सावंत यांनी केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय तपासयंत्रणा ईडी हे भाजपचे उपकार्यालय असल्याची टीकाही अरविंद सावंत यांनी केली आहे. अमित शाह यांच्यावर टीका करताना सावंत यांनी म्हटलं आहे की, मैने ऐसे कोई बोला नही था, हा गजनीचा झटका येत असतो. अमित शाह हे गजनी असतील, मात्र उद्धव ठाकरे रामशास्त्री बाण्याचं काम करणारे आमचे नेतृत्व आहे हे लक्षात ठेवा. असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला आहे.

- Advertisement -

ईडी भाजपचे उपकार्यालय

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात करण्यात आलेल्या ईडीच्या कारवाईवरुन टीका केली आहे. भाजप केंद्रीय यंत्रणांचा राजकीय वापर करत आहे. ईडी हे भाजपचे उपकार्यालय आहे. शिवसेनेला बदनाम करण्याचं कारस्थान करण्यात येत आहे. भाजपशासित बिहार, उत्तर प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराचा कळस आहे तिकडे तपास यंत्रणा कारवाई करत नाही असा सवालही अरविंद सांवत यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेने नेते अनिल परबसुद्धा ईडीच्या चौकशीला सामोरे जातील त्यांच्यामध्ये क्षमता आहे. अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर बीएसएनएलची जमीन हडप केली अल्याचा आरोप आहे. याबाबत कोर्टात केस सुरू असून ती पराभूत होण्याच्या मार्गावर असल्यामुळे ही कारवाई मागे लावली असल्याचा आरोप अरविंद सांवत यांनी केला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे – अमित शाह भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट झाली असून राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. नक्षलग्रस्तांच्या मुद्द्यावर या भेटीमध्ये चर्चा करण्यात आली आहे. नक्षलग्रस्त राज्यातील नक्षली कारवाया रोखण्यापासून ते नक्षलग्रस्तांना मिळणारी आर्थिक रसद रोखण्याच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली आहे. नक्षलवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने यामध्ये चर्चा करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते. केंद्रीय अमित शाह यांच्यासोबत तब्बल साडेतीन तास नक्षलग्रस्त भागावर चर्चा करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ईडीच्या चौकशीवेळी शिवसेना नेते अडसूळ यांची तब्येत बिघडली; गोरेगावच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -