तक्रार दाखल होत नाही तोवर हटणार नाही, अरविंद सावंतांचा दादर पोलीस ठाण्यात ठिय्या

संतोष तेलवणे यांच्या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला असून शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. यामुळे शिवसनेचे पदाधिकारी संतापले आहेत.

arvind sawant

मुंबई – जोपर्यंत तक्रार दाखल करून घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केला आहे. प्रभादेवी राडाप्रकरणी आज सकाळपासून राजकारण तापलेलं असताना आता अरविंद सावंतसह शिवेसनेचे अनेक नेते उपनेते दादर पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना अटक केली असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला आहे.

हेही वाचा – शिवसेना आणि शिंदे गट मध्यरात्री भिडले, दोन्ही गटात हाणामारी; सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप

प्रभादेवी येथे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात झालेला राडा अद्यापही शमलेला नाही. गणेश चतुर्थीदिवशी शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्याव म्यावचा आवाज काढून डिवचलं. यावरून जे घमासान सुरू झालं ते अद्यापही थांबलेलं नाही. दरम्यान, संतोष तेलवणे यांच्या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला असून शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. यामुळे शिवसनेचे पदाधिकारी संतापले आहेत.

शिवसेना नेते अनिल परब, खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर दादर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून सदा सरवणकर यांनी केलेल्या गोळीबारप्रकरणी तक्रार दाखल होत नाही तोवर इथून हलणार नाही, असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला आहे. अरविंद सावंत यांनी ट्विट करून ही माहिती दिली.


शिवसेना-शिंदे गट यांच्यात वाद सुरू असताना आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला, असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला आहे. या गोळीबारातून महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले असाही दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. मात्र, अशाप्रकारचा गोळीबार झालाच नाही, असं शिंदे गटाने स्पष्ट केलंय. त्यामुळे सदा सरवणकर यांनी केलेल्या गोळीबारप्रकरणी जोपर्यंत तक्रार दाखल होत नाही, तोवर पोलीस ठाण्यात हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा अरविंद सावंत यांनी घेतला आहे.

हेही वाचा – प्रभादेवी राडाप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल, पाचजण अटकेत; शिंदे गटाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई

काय आहे प्रकरण?

गणेश विसर्जनच्या दिवशी प्रभादेवीमध्ये शिवसेनेकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यासाठी मंच उभारण्यात आला होता. या मंचाच्या शेजारीच शिंदे गटानेही मंच उभारला होता. शिंदे गटातील लोकांनी शिवसेनेच्या नेत्यांवर अपशब्द केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. यातून शिंदे गटातील माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि शिवसेनेतील माजी नगरसेविका हेमांगी वरळीकर यांच्यात वाद निर्माण झाले. शाब्दिक बाचाबाची होऊन वाद वाढत गेला. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शनिवारी याबाबत दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हा वाद इथेच शमेल असं वाटत असतानाच या वादाबाबत शिंदे गटातील संतोष तेलावणे यांनी फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर एक पोस्ट लिहून अपशब्द वापरले. यावरून शिवसैनिक संतापले आणि त्यांनी संतोष तेलावणे यांना शनिवारी मारहाण केली. यानंतर समाधान सरवणकर यांनी प्रभादेवी सर्कलजवळ गोंधळ घातला. तसेच, त्यांनी पोलिसांशीही हुज्जत घातला असल्याचं म्हटलं जातंय.

पोलिसांच्या कारवाईनंतर दादर पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याकरता पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.  आमदार सदा सरवणकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. यावेळी सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या गोळीबारात शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत आणि एक पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले असा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. मात्र, सदा सरवणकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान,  शिवसेना – शिंदे गटात मध्यरात्री झालेल्या राड्याप्रकरणी २५ जणांवर गुन्हे दाखल झाले असून ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शिंदे गटातील संतोष तेलवणे यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून अटक केलेल्यांमध्ये शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांचाही समावेश आहे.