सॅम डिसुजा मनी लाँड्रिंगमधील मोठा खिलाडी; इंटरवलनंतर मी गोष्टी समोर आणणार – संजय राऊत

sanjay raut

एनसीबी पंच प्रभाकर साईल यांनी खळबळजनक खुलासा केल्यानंतर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. साईल यांनी एनसीबीच्या छापेमारीची पोलखोल केल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि प्रवक्ते यांनी इंटरवलपर्यंतची गोष्ट सांगितली आहे. इंटरव्हल नंतरची पुढची कथा मी सांगेन, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला. तसंच, सॅम डिसुजा मनी लाँड्रिंगमधील मोठा खिलाडी असल्याचं देखील राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मनी लाँड्रिंग आहे आणि याची ईडीने चौकशी करावी, असं देखील राऊत म्हणाले. मी जो व्हिडिओ शेअर केला आहे, यात काळ्या कपड्यांमध्ये एक व्यक्ती बाजूला बसली आहे. ती व्यक्ती सॅम डिसुजा आहे. तो मनी लाँड्रिंगच्या खेळाचा मुंबईतील मोठा खिलाडी आहे. तो तिथे बसल्याचं दिसतंय. तो आत का बसला आहे? असा सवाल करत हा एक मोठा खेळ असून आता खेळाला सुरुवात झाली आहे, असं राऊत म्हणाले. तसंच, वसुली गँग कुणाच्या होत्या. इंटरवलपर्यंतची गोष्ट नवाब मलिक यांनी सांगितली आहे, इंटरवलनंतरची कथा, स्क्रिनप्ले मी तुम्हाला सांगेन, असं राऊत म्हणाले.

प्रभाकरच्या केसाला देखील धक्का लागणार नाही

या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलच्या केसालाही धक्का लागणार नाही. त्याला त्रास देण्याचा प्रयत्न होईल. पण आम्ही त्याच्या पाठी आहोत. हे केवळ मुंबईपुरतं नाही आहे तर, दिल्ली पर्यंत याचे धागेदोरे आहेत. जो खुलासा या मुलाने केला आहे, त्याने देशावर उपकार केले आहेत. त्याच्या हिंमतीला दाद देत राऊत यांनी हीच खरी देशभक्ती आहे, असं म्हमत पाठीवरती कौतुकाची थाप दिली आहे.

अजून दहा व्हिडिओ देतो, सीबीआय चौकशी करा

त्या व्हिडिओची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपवाले करत आहेत. जरुर त्या व्हिडिओची जरुर चौकशी व्हायला पाहिजे. सीबीआय तुमच्या खिशात आहे का? की तिथे पण कोणी बसला आहे खोट्या केसेस करणारा, असा घणाघात राऊत यांनी केला. आतापर्यंत एवढे व्हिडिओ समोर आले, त्याची चौकशी करा नाही म्हटलं. पण आता तुमच्या काळजाला समोरुन वार जो झाला आहे, त्यानंतर तुम्ही म्हणताय सीबीआय चौकशी करा. नक्की करा. अजून दहा व्हिडिओ देतो मी तुम्हाला. यामध्ये भाजपचे किती लोकं बसले आहेत, कोणाबरोबर बसले आहेत हे मी देणार आहे, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्राला बदनाम करण्याची संधी सोडली नाही

किरण गोसावी कुठे आहे हे भाजपला माहिती असणार. तसंच परमबीर सिंह कुठे आहेत हे भाजपला माहिती आहे. या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एक ही संधी यांनी सोडली नाही, अशी टीका राऊत यांनी भाजपवर केली आहे.