घरमहाराष्ट्रखासगी मालमत्ता म्हणून कोणीही शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही, फडणवीसांचा टोला

खासगी मालमत्ता म्हणून कोणीही शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही, फडणवीसांचा टोला

Subscribe

मुंबई : शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय दिला. यावरून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. तर, राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाने देखील लोकशाहीचा हा सर्वात मोठा विजय असल्याचे म्हटले आहे. आता कोणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही, असा टोलाही ठाकरे यांना लगावला आहे.

गेल्यावर्षी जूनमध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर ऑक्टोबरमध्ये ठाकरे आणि शिंदे गटातील निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा वाद शिगेला पोहोचला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे खोक्यांचा विजय आहे. या निर्णयामुळे नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास उडाला आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची भूमिका पुढे घेऊन जाणार, हा बहुमताचा विजय, सत्याचा विजय आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेले धनुष्यबाण मी सोडवले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो. कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरच ते चालत आहेत. त्यांचाच विचार पुढे नेण्याचे ते काम करत आहेत. त्यामुळे या निकालाबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आता कोणीही खासगी मालमत्ता म्हणून शिवसेनेवर अधिकार सांगू शकणार नाही. ज्यांच्याकडे शिवसेनेचा विचार आहे, त्यांचीच शिवसेना खरी हे आम्ही सांगत होतो. निवडणूक आयोगाने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केले आहे. निवडणूक आयोगाने याआधीच्या प्रकरणांमध्येही असाच निर्णय दिला आहे. आमदार, खासदार अशा लोकप्रतिनिधींची संख्या लक्षात घेऊन तसेच त्यांना मिळालेल्या मतांच्या आधारावर, टक्केवारीवरच असे निर्णय होत असतात, असेही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

सेना-भाजपा युती महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेईल
शिवसेना ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचीच आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी वारसा चालवणारी शिवसेना आणि भाजप युती महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेईल, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -