घरमहाराष्ट्रनाशिकतब्बल 83 कामगार बेपत्ता! इगतपुरीच्या जिंदाल कंपनीतील आगीचे भीषण वास्तव

तब्बल 83 कामगार बेपत्ता! इगतपुरीच्या जिंदाल कंपनीतील आगीचे भीषण वास्तव

Subscribe

मुंबई : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील पॉलिफिल्मची निर्मिती करणार्‍या जिंदाल कंपनीतील एका प्लांटमध्ये रविवारी (1 जानेवारी 2023) सकाळी बॉयलरच्या स्फोटानंतर भीषण आग लागली. त्यात दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला तर, 19 कामगार जखमी झाले. मात्र, या आगीचे आणखी एक भीषण वास्तव समोर आले आहे. या कंपनीतील 83 कामगार बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते.

जिंदाल कारखान्यातील एसएसपी-2 या प्लांटमध्ये रविवारी सकाळी 8 ते दुपारी 2.30 वाजेच्या शिफ्टमध्ये सुमारे 100 कामगार काम करत होते. यामध्ये अनेक कामगार बिहार, मध्यप्रदेशासह इतर राज्यातील आहेत. सर्व कामगार आपापल्या विभागात काम करत होते. सकाळी 10 ते 11च्या दरम्यान बॉयलर क्षमतेपेक्षा अधिक गरम झाल्याने मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. आग पाहून कामगार सुटकेसाठी प्रयत्न करू लागले. मात्र, कंपनीतून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने आणि आगीने रौद्ररुप धारण केल्याने चार कामगार गंभीर जखमी झाले. त्यातील दोन महिला कामगारांचा कंपनीतच मृत्यू झाला. अन्य 19 जखमी कामगारांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच दिवशी जखमींची भेट घेतली आणि मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

- Advertisement -

तथापि, या कामगारांपैकी 83 जणांशी संपर्क होत नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने केला आहे. माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांची भेट घेऊन या कामगारांचा शोध घेण्याची मागणी केली. या कंपनीत जवळपास सात हजार कामगार असून त्यापैकी चार हजार कामगार कंपनीच्या आवारातच राहतात. तर उर्वरित कामगार आसपासच्या गावांत राहतात. 700 कामगार घोटीत राहतात. या कामगारांपैकी 83 जणांशी कुटुंबीयांचा संपर्क होत नसल्याचा दावा या शिष्टमंडळाने केला आहे. त्यामुळे या 83 जणांचा शोध घेण्याबरोबरच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत करण्याची मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -