पतीसोबत पटत नसल्याने उपायासाठी गेली भोंदूकडे; त्याने ५ वर्ष केले लैंगिक शोषण

नाशिक : म्हसरूळ शिवारातील आधाराश्रमात अध्यक्षाने सात मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले असतानाच भोंदूबाबाने अंगात दैवी शक्ती असल्याने भासवून विवाहित महिलेवर तब्बल 5 वर्ष बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. भोंदूबाबाने घर घेऊन देतो, असे आमिष दाखवत महिलेकडून पाच लाख रूपये घेत फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

भोंदूबाबा विष्णू काशीनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा (वय ५२, रा. जयाबाई कॉलनी, नाशिकरोड, नाशिक), त्याची पत्नी जयाबाई वारूंगसे, सुनिता विष्णू वारुंगसे, उमेश वारुंगसे, वैशाली वारुंगसे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला एप्रिल 2018 पासून संशयित विष्णू वारुंगसे उर्फ देवबाबा याच्या संपर्कात आहे. पतीसोबत पटत नसल्याने बाबा जडीबोटी देत घरातील पीडा दूर करतो, असे तिला कुणीतरी सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवत महिला भोंदूबाबाकडे गेली होती. देवबाबाने महिलेच्या सर्व समस्या ऐकून घेतला. त्याचा गैरफायदा घेत त्याने महिलेला मानसिक धीर देत पूजा करण्याचा बहाणा करत तिला नाशिकरोड परिसरात भाडेकरारावर एक खोली घेऊन दिली. या ठिकाणी भोंदूबाबने पूजा करण्याचा बहाणा करत तिच्यावर बलात्कार केला. महिलेने नकार दिला तर माझ्याकडे दैवी शक्ती आहे. तुला तुझा नवरा परत मिळवून देईल तसेच स्व:ताचे घर घेऊन देण्याचे अमिष देत महिलेकडून 5 लाख रुपये घेतले.

एप्रिल २०१८ ते ऑक्टोबर २०२२ या काळावधीत भोंदूबाबाने महिलेवर वारंवार बलात्कार केला. पीडित महिलेने बाबाकडे घर कधी देणार, घर नाही तर पैसे तरी परत द्या, अशी मागणी केली. त्यानंतर भोंदूबाबाने महिलेला धमकी देत ब्लॅकमेल केले. अनैतिक संबधाची माहिती सर्वांना देईल, असे सांगत भोंदूबाबाने पीडित महिलेला धमकावत पैसे परत देण्यात नकार दिला. शेवटी महिलेने पोलीस ठाण्यात येत पोलिसांना आपबिती सांगितली. याप्रकरणी बलात्कारासह धमकी, फसवणूक व अ‍ॅट्रोसिटी अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ करत आहेत.

जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करा : अंनिस

देवबाबानेे अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केले आहेत. असे असतानाही भोंदूबाबाविरोधात जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम या गुन्ह्यात लावलेले नाही. त्यामुळे पीडित महिलेस न्याय मिळण्यासाठी भोंदूबाबाविरोधात जादूटोणा विरोधी कायद्याचे कलमान्वये गुन्हा दाखल करावा. भोंदूबाबाने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. भोंदूबाबा व त्याच्या साथीदारांची कसून चौकशी करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. डॉ. सुरेश घोडेराव, राजेंद्र फेगडे, अरुण घोडेराव, राजेश शिंदे व विजय खंडेराव यांनी निवेदनाव्दारे उपनगर पोलिसांकडे केली आहे.

पीडित महिलेवर बलात्कार करणार्‍या भोंदूबाबाचा शोध घेतला आहे. त्याच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत. तो लवकरच पोलिसांच्या जाळ्यात येईल. : डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त