घरमहाराष्ट्रपालिकेतील फर्निचर घोटाळा बाहेर येणार होता म्हणून..., संदीप देशपांडेंनी सांगितलं कारण

पालिकेतील फर्निचर घोटाळा बाहेर येणार होता म्हणून…, संदीप देशपांडेंनी सांगितलं कारण

Subscribe

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर काल, शुक्रवारी सकाळी शिवाजी पार्कात हल्ला झाला. याप्रकरणी तक्रार दाखल करताना संदीप देशपांडे यांनी वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे यांचं नाव जबाबात नोंदवलं आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मोठा घोटाळा उघडकीस आणला आहे. हा घोटाळा बाहेर येऊ नये म्हणूनच माझ्यावर हल्ला झाला असावा, असा संशय संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

कोविड काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचं सांगत फर्निचर घोटाळा झाला असल्याचंही संदीप देशपांडे यांनी आज सांगितलं. याबाबत आपण मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचीही भेट घेतली होती. याप्रकरणाचा सुगावा लागला असेल म्हणून माझ्यावर हल्ला झाला असेल, असं संदीप देशपांडे म्हणाले. तसंच, कोविड काळातील भ्रष्टाचारप्रकरणी इकोनॉमिक्स अफेअर्स विंगने बाळा कदम यांना अटक केली, त्यानंतर ४८ तासांनी माझ्यावर हल्ला झाला, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी तपासाला वेग, दोघेजण ताब्यात; विशेष पथकाचीही नेमणूक

काय आहे फर्निचर घोटाळा?

- Advertisement -

महावीर फर्निचर आणि ग्रेस फर्निचर या दोन्ही कंपन्यांचा टर्नओव्हर कोविड काळाच्या आधी दहा लाख होता. मात्र, कोविड काळानंतर या दोन्ही कंपन्यांचे टर्नओव्हर कोट्यवधींच्या घरात केले आहेत. कोविड काळात या दोन्ही कपन्यांना कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळाले होते. कोविड सेंटर्समध्ये बेडशीट, गाद्या, कॉट पुरण्याचं कंत्राट यांना मिळालं होतं. मात्र, या दोन्ही कंपन्यांकडून कोविड सेंटर्सना साहित्य पुरवण्यातच आले नाहीत, तरीही भरमसाठ बिले पाठवण्यात आली.

साहित्य पुरवण्यासाठी आधी परसेच ऑर्डर किंवा असेट असावी लागते, या कंपन्यांचं तसंही काही नाही, असंही संदीप देशपांडे यांनी सांगतिलं. याप्रकरणात ज्या व्यक्तीचा हात आहे, त्याचं नाव देढिया आहे. या व्यक्तीचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत फोटो आहेत. याच माणसाला मुंबई पालिकेतील विविध वॉर्डाची फर्निचरचे कंत्राट कसे मिळतात? हे सर्व घोटाळे मी येत्या दोन दिवसांत बाहेर काढणार होतो. याचा सुगावा त्यांना लागला असावा, म्हणूनच माझ्यावर हल्ला झाला, असं संदीप देशपांडे म्हणाले.

त्यांना माझं तोंड बंद करायचं होतं तर त्यांनी माझ्या थोबाडावर मारायला पाहिजे होतं. त्यांनी माझ्या डोक्यावर, हातावर मारलं. तुम्ही माझं थोबाड बंद करू शकणार नाहीत, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करूच, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.

हल्लेखोरांना सुरक्षा पुरवा

माझ्यावर हल्ला झाल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून माझ्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर, त्यांनी माझ्या सुरक्षेसाठी दोन पोलीसही दिले आहेत. परंतु, मला या सुरक्षेची गरज नाही. माझ्यावर हल्ले करणाऱ्यांना सध्या सुरक्षेची गरज आहे. त्यांना सुरक्षा द्या, असं संदीप देशपांडे म्हणाले. अशा हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही. अजिबात भीक घालत नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट नाव उच्चारलं नाही. हे प्रकरण पोलिसांकडे आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत असल्याने मी आज कोणाचंही नाव घेणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले. यामुळे पोलिसांच्या तपासात अडचण येऊ शकते. मात्र, त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही लवकरच याप्रकरणातील हल्लेखोर आणि त्यांच्या मास्टरमाईंडची नावं सांगू असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -