संपर्क साधल्यास मदत करू, ओवेसींची मविआला खुली ऑफर

महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास तर विचार करू. कुणाला मतदान करायचे यावर आम्ही ठरवलेले नाही. आम्ही आमच्या आमदारांशी चर्चा करत आहोत. तरीही आम्ही २ दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका ओवेसी यांनी जाहीर केली.

Asaduddin Owaisi

राज्यसभा निवडणुकीला अवघे तीनच दिवस शिल्लक असल्याने महाविकास आघाडी खासकरून शिवसेनेची जुळवाजुळव अजूनही सुरू आहे. त्यातच राज्यसभेसाठी कुणाला आमचा पाठिंबा हवा असेल तर त्यांनी जगजाहीर मागावा. आम्ही तो नक्कीच देऊ, अशी खुली ऑफर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीला दिली आहे. एमआयएमकडे दोन मते असल्यामुळे या ऑफरवर शिवसेना आणि महाविकास आघाडी काय भूमिका घेतात. विशेष म्हणजे बैठकीसाठी आमंत्रण देण्यासाठी त्यांच्याकडे कोण जाणार, याचीच सर्वांना उत्सुकता आहे.

महाराष्ट्रात आलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यसभा निवडणुकीवर भाष्य करताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीने अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही.

महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास तर विचार करू. कुणाला मतदान करायचे यावर आम्ही ठरवलेले नाही. आम्ही आमच्या आमदारांशी चर्चा करत आहोत. तरीही आम्ही २ दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका ओवेसी यांनी जाहीर केली.

नक्कीच संवाद साधू
आम्ही एमआयएमशी नक्कीच संवाद साधू. आमच्यासोबत समाजवादी पक्ष आहे. त्यामुळे आमच्याकडून समाजवादी पक्षाला विनंती केली जाणार आहे. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या आम्ही संपर्कात आहोत. प्रत्येक छोट्या मोठ्या पक्षाला महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन करू.
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस