घरमनोरंजनआशा भोसले यांचा आज 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरव, गेटवे ऑफ इंडियाला भव्य...

आशा भोसले यांचा आज ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव, गेटवे ऑफ इंडियाला भव्य सोहळा

Subscribe

मुंबई : गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांना शुक्रवार, दि. 24 मार्च 2023 रोजी राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या भव्यदिव्य सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आशाताईंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अशा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. सन 2021 या वर्षीचा पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर झाला. या पुरस्कार सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar), सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला. संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली 1943 साली. त्यानंतर 1948मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवलंय. बॉलीवूडमध्ये तब्बल 1000हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केले आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना ‘मेलडी क्वीन’ म्हणून ओळखले जाते.

आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात ‘चतुरस्र’ हा शब्दही थीटा पडावा अशी चौफेर कामगिरी बजावत आशाताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. या जवळपास सात दशकांच्या वाटचालीत त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत. विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलुगू, तामिळ, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळाले होते.

- Advertisement -

आशाताईंच्या या सोनेरी कारकीर्दीचा सन्मान करण्यासाठी शुक्रवारी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार थाटात आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी ‘आवाज चांदण्याचे’ या सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून सुदेश भोसले, साधना सरगम, ऋषिकेश कामेरकर, आर्या आंबेकर, बेला शेंडे, मधुरा दातार हे कलाकार आशा भासले यांच्या सदाबहार गीतांचा समुमधुर कार्यक्रम सादर करणार आहेत. अभिनेते सुमित राघवन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून शिवाजी नाट्यमंदिर, दादर; दामोदर हॉल, परळ; प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली; दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले; काशिनाथ घाणेकर नाटयगृह, ठाणे; वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण; गडकरी रंगायतन, ठाणे; विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी या ठिकाणी कार्यक्रमाच्या सन्मानिका, ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्वावर उपलब्ध आहेत.

हेही वाचा – भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यात विराटने केला ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स; व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -