आषाढी वारी २०२२ : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे इंदापुरात पहिले रिंगण पार पडले

ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे आज पहिले रिंगण इंदापूर येथे पार पडले. या भक्तिमय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती.

रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी परिसरातील नागरिक शिस्तबद्ध रिंगणाच्या बाहेर बसले होते.

आषाढी वारी सुरु झाली की सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. या वर्षीची आषाढी वारी वारकरी पायी चालत करत असल्याने वारकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. वैष्णवांचा हा मेळा विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतो. ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे आज पहिले रिंगण इंदापूर येथे पार पडले. या भक्तिमय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती.

आणखी वाचा – आषाढी वारी २०२२: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या नीरा स्नान सोहळ्याचा वारकऱ्यांनी आनंद…

 

आणखी वाचा – आषाढी एकादशीनिमित्त मराठवाडा ते पंढरपूर विशेष ट्रेन

 

लाल मातीच्या गोल रिंगणावरून पांढऱ्याशुभ्र काड्यांवरून मानाचे अश्व धावले. उत्सहात आणि आनंदात हा रिंगण सोहळा आज इंदापूरमध्ये पार पडला. इंदापूर शहरातील सौ. कस्तुरा बाई श्रीपती कदम या विद्यालयाच्या प्रांगणात या अश्वांचे गोल रिंगण पार पडले. रिंगणाचा हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी अनेक भक्तांनी गर्दी केली होती. अनेक दिवसांचा पायी प्रवास करून अनेक वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी हातात ध्वज आणि डोईवर तुळस घेऊन पंढरपूरला जात असतात. टाळकरी, माळकरी आणि अनेक भाविक ज्ञानोबा माउली म्हणत रिंगणाभोवती उभे असतात. ज्ञानोबा माउली तुकाराम म्हणत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकी इथला मुक्काम आटोपून इंदापूर शहरात दाखल झाली. आज सकाळी ११. ३० वाजता हा रिंगण सोहळा सुरु झाला. पालखी सोहळा रिंगणाच्या ठिकाणी हरिनामाच्या जयघोषात दाखल झाला. या वेळी त्या ठिकाणी भक्तीमय वातावरण झाले होते. या वेळी सर्व दिंड्यानी पालखीला प्रदक्षिणा सुद्धा घातली. या नंतर विठुरायाच्या गजर करत वारकरी सुद्धा खांदयावर पताका घेऊन धावले. रिंगण सोहळ्यात मनाचे अश्व धावताना पाहणं ही उपस्थित वारकऱ्यांसाठी एक भक्तीमय पर्वणीच होती. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अश्वांची पूजा सुद्धा केली.

आणखी वाचा – आषाढी वारी २०२२ : आजपासून विठुरायाचे २४ तास दर्शन होणार, पंढरपुरात जमणार…

 

आणखी वाचा – आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा का केली जाते ?

 

दरम्यान मागच्या दोन वर्षांपासून कोव्हीड मुळे आषाढी वारी होऊ शकली नव्हती. पण या वर्षी मात्र आषाढी वारी अगदी आनंदाने आणि उत्सहाने पार पडते आहे. त्यामुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. आषाढी वारी सुरु झाल्यामुळे विठ्ठलाच्या जयघोशाने आसमंत दुमदुमून निघाला आहे. आणि अशातच आज रिंगण सोहळा सुद्धा पार पडला.