वारकर्‍यांसाठी खूशखबर आषाढी वारीची २० जूनला सुरुवात

Final decision on Ashadi Wari Palkhi will be taken unanimously in cabinet meeting - Ajit Pawar

देहू संस्थानने आषाढी वारीची घोषणा केली आहे. यानुसार संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. यंदा पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहचणार असून 10 जुलैला आषाढी एकादशी आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याची घोषणा रविवारी करण्यात आली. यंदा पालखी देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. कोरोना ओसरल्यामुळे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होणार आहेत. आषाढी वारीची घोषणा झाल्यामुळे वारकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे वारकर्‍यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही, मात्र परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला. दोन वर्षांनंतर यंदा मोठ्या थाटामाटात आषाढी वारीसाठी वारकरी उत्सुक आहेत. आषाढी वारीची गावागावांत वारकर्‍यांकडून तयारी सुरू झाली आहे. आता या सर्वांना संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासह विठूचरणी माथा टेकविण्याची आस लागली आहे.