घरताज्या घडामोडीभाजप प्रदेशाध्यक्षपद : आशिष शेलार की संजय कुटे ? कोणाची वर्णी लागणार

भाजप प्रदेशाध्यक्षपद : आशिष शेलार की संजय कुटे ? कोणाची वर्णी लागणार

Subscribe

महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी खांदेपालट करण्याची चर्चा सध्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे सुरू झाली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या पदाच्या कालावधीला २ वर्षे पुर्ण झाली आहेत. याआधी १६ जुलै २०१९ रोजी त्यांची नेमणुक भाजप प्रदेशाध्यक्षपदी करण्यात आली होती. हा दोन वर्षांचा कालावधी १६ जुलैला संपल्यानेच येत्या वर्षात फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या राज्यातील विविध महापालिका निवडणुका पाहता महाराष्ट्र भाजपला तरूण नेतृत्व देण्याच्या उद्देशानेच सध्या भाजप आमदार आशिष शेलार आणि आमदार संजय कुटे या दोघांची नावे सध्या चर्चेत आहेत. आशिष शेलार यांनी शुक्रवारीच अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यातही गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अशा आशिष शेलार यांना आगामी महापालिका निवडणूका पाहता संधी मिळण्याची संकेत आहेत. आक्रमक आणि अनुभवी असा महापालिकेतील चेहरा पाहता त्यांना ही संधी देण्यात येईल अशी माहिती आहे.

कोण तगडा दावेदार ?

याआधीचे भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांची नेमणुक ही १६ जुलै २०१९ रोजी करण्यात आली. त्यानंतर १३ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना पक्षाकडून पुन्हा एकदा भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी मुदतवाढ देण्यात आली. पण भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा दोन वर्षांचा कालावधी संपल्यानेच आता या जागेसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामध्ये भाजपचे नेते आशिष शेलार, आमदार संजय कुटे आणि माजी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची नावे आघाडीवर आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार हे मराठा चेहरा असून त्यांच्याकडे याआधीचा महापालिकेचा चांगला अनुभव आहे. याआधी शिवसेनेला महापौर पद देण्याच्या मुद्दयावर आशिष शेलार यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच मुंबई महापालिका निवडणूकीत आशिष शेलार यांच्या नेतृत्वातच पक्षाने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळेच आशिष शेलार यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे. त्यासोबतच स्पर्धेत असणारे संजय कुटे हेदेखील तरूण नेते आणि ओबीसी समाजाचा चेहरा असणारे नेते आहेत. त्यामुळे या पदासाठीच्या स्पर्धेत संजय कुटे हेदेखील असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरा ओबीसी चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचेही नाव चर्चेत आहे.

- Advertisement -

आशिष शेलारांचे दिल्लीतले लॉबिंग वाढले

याआधीच्या भाजप सेना युती सरकारच्या काळात आशिष शेलार यांना मंत्रीमंडळ विस्तारात मोजक्याच कालावधीसाठी शालेय शिक्षण हे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. पण हा कालावधी अत्यल्प असा ठरला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आशिष शेलार यांच्याकडे असणारे मुंबई अध्यक्षपद काढून घेण्यात आले. तसेच मुंबईचे प्रभारी पदही काढून घेण्यात आले. त्यांच्याकडे मुंबई एवजी नवी मुंबईचे प्रभारीपद देण्यात आले. पक्षात त्यांना साईडलाईन करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. पण आशिष शेलार यांनी आपले दिल्लीतला संपर्क वाढवल्यानेच महाराष्ट्र अध्यक्षपदासाठीचे ते सध्याच्या घडीचे तगडे दावेदार मानले जात आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -