मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (23 जानेवारी) शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत पार पडले. यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांचा मेळावा अंधेरी येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. जिथे औरंगजेबाला झुकवले, तिथे अमित शहा काय? असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीका केली. याप्रकरणी आता सांस्कृतिक कार्यमंत्री व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे तुम्ही अमित शहांच्या पाठीवर वळ उठवणार आहात का? असा थेट प्रश्नच त्यांनी विचारला आहे. (Ashish Shelar strong response to Uddhav Thackeray for criticizing Amit Shah)
आशिष शेलार यांनी ट्वीट करताना म्हटले की, उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 चा आहे. त्यामुळे 1951 साली स्थापन झालेल्या जन संघाविषयी त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही. 5 आणि 6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीत जन संघांच्या नेत्यांची बैठक होऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे वय फक्त 20 वर्षे होते. त्यामुळे याबाबत त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही, अशी मिश्किल टिप्पणी शेलार यांनी केली.
हेही वाचा – Sanjay Raut : 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला शिवसेना ठाकरे गटाची संविधान आणि भारतमाता पूजन मिरवणूक – राऊत
◆श्रीमान उध्दव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 चा आहे. त्यामुळे 1951 साली स्थापन झालेल्या जन संघाच्या विषयी त्यांना काही माहिती असण्याचे कारण नाही.
◆ 5 आणि 6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीत जन संघांच्या नेत्यांची बैठक होऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला त्यावेळी श्रीमान…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 24, 2025
आशिष शेलार म्हणाले की, फोटोग्राफी करण्यात दंग असलेल्या आणि “करगोट्यातून इज्जत निसट्याच्या वयात” असतानाच्या काळातील संदर्भ देऊन बोलणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आमचे सांगणे आहे की, तुम्ही कुठे जन संघ आणि भाजपाच्या स्थापनेवर बोलता? 100 वर्षे पूर्ण करणाऱ्या संघावर बोलता? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात देशाचा बहुमान उंचावला तसेच भाजपाला जगात एक नंबरचा पक्ष ज्यांनी करून दाखवला त्या अमित शहा यांच्यावर बोलता? मात्र समाजवाद्यांची पुस्तके वाचून महाराष्ट्र आणि जनसंघाचा इतिहास तुम्हाला कळणार नाही. उद्धव ठाकरे तुम्ही अमित शाह यांच्या पाठीवर वळ उठवणार आहात का? कसले? आणि केव्हा? असा प्रश्नांचा भडीमार शेलार यांनी केला.
आशिष शेलार म्हणाले की, आधी तुम्ही तुमचे वडील म्हणजे अखंड हिदूंचे आशास्थान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा 26 जुलैच्या पुरात अडकले होते. तेव्हा तुम्ही मिठी नदीच्या पुराला “पाठ दाखवून” पंचतारांकित हॉटेलमध्ये पळालात. त्या दुर्दैवी घटनेचे वळ तुमच्या पाठीवर आणि आयुष्यावर खूप खोल आहेत, ते कधीतरी मातोश्रीच्या आरशा समोर उभे राहून पाहा. कंत्राटदारांकडून कटकमिशन खाऊन मुंबईचा जो बट्याबोळ केलात, त्याचे व्रण दोन कोटी मुंबईकरांच्या काळजावर आहेत. त्याच्या सुरकुत्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतात का? हे पण आरशाला विचारून पाहा. मग कळेल जखमा खोल आहेत की, तुमच्या मेंदूतच झोल आहे.