सत्यजित तांबे यांच्या आरोपावर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच….”

सत्यजित तांबे यांनी कॉंग्सेवर केलेल्या आरोपांवर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

ashok chavan

नाशिक पदवीधर मतदारसंघातून नुकतंच निवडून आलेले आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयावर गंभीर आरोप केले. आपल्याला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. तसेच आपल्या परिवाराला बदनाम करण्याचे षडयंत्र होतं, असा देखील आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. त्यांच्या आरोपांवर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

एका खाजगी वृत्तवाहिनीसोबत बोलताना अशोच चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, सत्यजीत तांबेंना कॉंग्रेस पक्षातून बाहेर काढण्याचा प्रश्नच येत नाही. जर तुम्हाला कॉंग्रेसक़डून लढायचं होतं तर कुणी नाकारलं होतं? डॉ. सुधीर तांबे हे विद्यमान आमदार होते. वडिलांच्या ऐवजी मला निवडणूक लढवायची आहे, असं सांगितलं असतं तर याला कोणीच विरोध केला नसता. पण पक्षश्रेष्ठींनी सुधीर तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर अचानक उमेदवार बदलणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे जर आधीच उमेदवारी मागितली असती तर विषय नसता. समोर विरोधक भाजपा आहे. त्यामुळे आपल्यात कोणतेही संदिग्ध वातावरण राहणं योग्य नाही. पारदर्शकता राहिली असती, तर संदिग्धता टाळता आली असती” असं अशोक चव्हाण म्हणाले.

“पक्षाध्यक्षांनी एबी फॉर्मच्या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. सत्यजित तांबे जे काही म्हणाले, याबाबतीत अखिल भारतीय काँग्रेसच्या पातळीवर माहिती घेऊन, त्याचा योग्य तो खुलासा पक्षाध्यक्ष करतील” असं अशोक चव्हाण म्हणालेत. यापुढे बोलताना अशोल चव्हाण म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघाबाबत जे काही घडलं ते योग्य नाही. कारण, हा मतदारसंघ काँग्रेसचा होता. मात्र, निवडणूक लढण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कळवावं लागतं. राज्यातून दिल्लीत प्रस्ताव गेल्यावर काँग्रेस अध्यक्ष त्यावर शिक्कामोर्तब करतात. मात्र, उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच सर्व काही करायला हवं होतं.”