‘महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ आता अधिक गतिमान होणार!’

Ashok chavan

विधान परिषद निवडणुकीचे निकाल राज्य सरकारला अधिक भक्कम करणारे आणि आत्मविश्वास दुणावणारे असून, या निकालांमुळे महाविकास आघाडीची महाराष्ट्र एक्सप्रेस अधिक गतिमान होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

आजच्या निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘राज्यातील सरकारच्या स्थापनेनंतर थेट जनतेतून होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल देऊन राज्य सरकारवर आपला विश्वास व्यक्त केला तर भाजपचा सपशेल पराभव केला. या निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत एकूण २४ जिल्ह्यात थेट जनतेतून मतदान झाले आणि सर्वच्या सर्व पाचही मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली. कोल्हापूर आणि गोंदिया या शहरांना जोडणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसप्रमाणे आता महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ देखील सुसाट होईल.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यामुळेच मागील अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ले म्हणून ओळखले जाणारे नागपूर आणि पुणे पदवीधर मतदारसंघ महाविकास आघाडीने जिंकले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीला दुप्पट मते मिळाली, तर पुणे शिक्षक मतदारसंघातही महाविकास आघाडी समोर आहे. या निकालांनी राज्य सरकारचे हात अधिक बळकट झाल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.


या राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध होते, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विधानपरिषद निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळालं आहे. जनमताचा हा कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान हा विजय महाविकास आघाडीसाठी कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना जयंत पाटील यांनी समर्पित केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते, हेही या निकालाने दाखवून दिले आहे असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला आहे.

महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील व मित्रपक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन करतानाच महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत.


विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळविला असून आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. दरम्यान हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती आहे असा विश्वासही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला आहे.

या यशासाठी अहोरात्र कष्ट करणारे कार्यकर्ते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी कष्ट घेतले. सर्वांच्या सुनियोजित अशा संघटीत प्रयत्नातून हा विजय साकारला आहे असेही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या विजयाचा आम्हा सर्वांना आनंद आहे. यासाठी मेहनत घेणाऱ्या प्रत्येकाचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अभिनंदन केले आहे.

काल (गुरुवारी) पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी विजय मिळवला. भाजपचे संग्राम देशमुख यांना अरुण लाड यांनी हरवले. आता औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीत राष्ट्रावादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी भाजपच्या शिरीष बोराळकर यांना पराभूत करत विजयाची हॅटट्रिक साधली आहे. सतीश चव्हाण यांना तब्बल १ लाख १६ हजार ६३८ मते मिळाली आहेत.


हेही वाचा – औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक