मुंबई:राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण लवकरच भाजपात प्रवेश करणार, असं बोललं जात असतानाच, अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, येत्या एक ते दोन दिवसांत मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन, पण कोणत्या पक्षात जायचं याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचंही विधान त्यांनी केलं आहे. (Ashok Chavan Will clarify political stance in two days but What is going on in Chavans mind)
अशोक चव्हाण म्हणाले की, मी आज काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी किंवा आमदाराशी बोललेलो नाही. कोण काय करेल, ते मला माहिती नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काँग्रेसच्या एकाही आमदाराशी माझं बोलणं झालेलं नाही, असं चव्हाण यांनी म्हटलं.
यावेळी अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्यामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली. प्रत्येक गोष्टीला कारण असलचं पाहिजे, असे काही नाही. मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. आता मला वाटते की, मी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता मी विचार करून पुढची दिशा ठरवेन. तसंच, मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितलं. तसंच मला कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची वाच्यता करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही, असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
मी पक्षासाठी खूप केलंय- अशोक चव्हाण
पक्षा का सोडत आहात? यावर चव्हाण म्हणाले की, पक्षाने मला खूप दिलं हे खरं पण मीही पक्षासाठी खूप केलं आहे. मी पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं आहे. पक्षाने मला मोठं केलं असेल तर मीपण पक्षासाठी काही कमी केलं नाही.