मराठा आरक्षणा संदर्भात अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा!

Ashok Chavan on Maratha Reservation
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगितीने निर्माण झालेली मराठा आरक्षणाची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये जोरदार खल सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून येत्या काही दिवसात मराठा समाजाला दिलासा देणारा निर्णय होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज ‘वर्षा’ वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर चव्हाण यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षण स्थगितीनंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी या नेत्यांमध्ये चर्चा झाली.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी  उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले,  मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणे ही प्रक्रिया आहे. यावर पुढे सुनावणी होईल. आज एक टप्पा पुढे गेलो आहोत. उद्या किंवा परवा मुख्यमंत्री याबाबत भूमिका मांडतील.

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याची माहिती पवारांना दिली. त्यांनीही आपली मते मांडली. सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत जी तयारी सुरू आहे त्याबाबतही चर्चा केली. काही कायदेशीर मुद्दे आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली. आपण न्यायालयात जातो आहोत. न्यायालयात घटनापीठ लवकर स्थापन व्हावे यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तींकडे प्रयत्न करत आहोत, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.


हे ही वाचा – परदेशात पैसे पाठवण्याऱ्यांना भरावा लागणार कर, १ ऑक्टोबरपासून नियम लागू!