तीन वेळा आमदार राहिलेल्या शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, शिवसेनेला धक्का

अशोक शिंदे यांनी मुंबईत मंगळवारी दुपारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला

Ashok Shinde joined the Congress in the presence of Congress State President Nana Patole
तीन वेळा आमदार राहिलेल्या शिवसेना नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, शिवसेनेला धक्का

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये शिवसेनेला धक्का बसला आहे. जळगावमध्ये शिवसेनेत इनकमिंग सुरु झाली होती. मात्र वर्धा जिल्ह्यात शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे यांनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोक शिंदे यांचे स्वागत केलं आहे. मागील अनेक महिन्यांपासून अशोक शिंदे शिवसेनेवर नाराज झाले होते. अखेर अशोक शिंदेंनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचा झेंडा हाती घेत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. अशोक शिंदे वर्धा हिंगणघाटचे माजी आमदार असून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

हिंगणघाट विधानसभा माजी आमदार अशोक शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे उपनेतेपद होते. अशोक शिंदेंनी १९९५ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणी आमदार म्हणून निवडून आले यानंतर ते ३ वेळा आमदार झाले. शिवसेनेत असताना राज्यमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा अशोक शिंदे यांना देण्यात आली होती. शिंदे यांना स्थानिक पातळीवर डावलल्यामुळे शिवसेनेवरिधात नाराजी पसरली होती. या नाराजीमुळे त्यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक शिंदेंनी जुलैमध्येच शिवसेना सोडली आहे.

माजी आमदार अशोक शिंदे यांचे शिवसेनेच्या माजी खासदारासोबत मतभेद झाले असल्याची चर्चा होती. शिवसेना माजी खासदार अनंत गुढे यांच्यासोबत मतभेद झाले असून शिवसेना पक्षप्रमुखांकडे अशोक शिंदे यांनी दाद मागितली होती. मात्र नेतृत्वाने दखल न घेतल्यानं शिवसेनेचा हात सोडला असल्याचे बोलले जात आहे. अशोक शिंदे यांनी मुंबईत मंगळवारी दुपारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

नाना पटोलेंनी केलं स्वागत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची जबाबदारी घेतल्यापासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत अशोक शिंदे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अशोक शिंदेंच्या प्रवेशामुळे काँग्रेसला हिंगणघाटमध्ये बळ मिळेल. नाना पटोले यांनी अशोक शिंदे यांचे पक्षात स्वागत करुन अभिनंदन केलं आहे.