चिंचवडमध्ये पुन्हा जगतापच; पोटनिवडणुकीत काटे, कलाटे पराभूत

अश्विनी जगताप यांना १३५४३४ मते मिळाली तर नाना काटे यांना ९९३४३, तर राहुल कलाटे यांना ४४०८२ मते मिळाली. ही पोटनिवडणूक भाजप व महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची झाली होती. महाविकास आघाडीने पूर्ण ताकदीने काटे यांचा प्रचार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारासाठी कंबर कसली होती. त्यामुळे मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

पुणेः चिंचवड येथील भाजपचे आमदार लक्ष्मण जगपात यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्याच पत्नी अश्विनी जगताप ह्या विजयी झाल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे व अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा पराभव करत या मतदारसंघात पुन्हा भाजपचाच उमेदवार निवडून आला आहे.

२६ फेब्रुवारीला चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. चिंचवडमध्ये 45.25 टक्के मतदान झाले. पोटनिवडणुकीत अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने निकालाविषयी उत्सुकता लागली होती. गुरुवारी या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. मतमोजणीत सुरुवातीपासूनच जगपात आघाडीवर होत्या. हळूहळू मतपेटी उघडल्या जात होत्या, तस तशा जगताप यांना मिळालेल्या मतांचा आकडा वाढतच चालला होता. अखेर काटे आणि कलाटे यांचा पराभव करत जगताप ह्या विजयी झाल्या. अश्विनी जगताप यांना १३५४९४ मते मिळाली, नाना काटे यांना ९९४२४ तर राहुल कलाटे यांना ४००७५ मते मिळाली.

पुण्यातील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप व मुक्ती टिळक यांचे गेल्यावर्षी निधन झाले. उभयंतांच्या कसबापेठ व चिंचवड मतदारसंघात निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहिर केली. कसबापेठ पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली. तर चिंचवड मतदारसंघात लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली. महाविकास आघाडीने नाना काटे यांना उमेदवारी दिली. मात्र राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला. कलाटे यांची मनधरणी करण्याचा ठाकरे गटाने खूप प्रयत्न केला. कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन सचिन अहिर हे चिंचवडला गेले होते. मात्र कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. कलाटे यांना २०१९ च्या निवडणुकीत तगडी मते मिळाली होती. त्यामुळे कलाटे यांच्या उमेदवारीच फटका काटे यांना पडणार असल्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. ही शक्यता खरी ठरली आणि जगताप ह्या विजयी झाल्या अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.