नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोरांचा शोध सुरू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास मुंबईतील भायखळा या परिसरात शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर नाशिक शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

सोमवारी रात्री साडे दहा-पावणे अकरा वाजेच्या सुमारास बाळा कोकणे हे त्यांच्या दुचाकीने एमजीरोडवरून जात होते. यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी संधी साधत त्यांच्यावर पाठीमागून धारदार शस्त्राने वार केला. बाळा कोकणे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच या प्रकरणाची चौकशी सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कोकणे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, शिवसेना विभाग क्रमांक ११चे उपविभाग प्रमुख विजय कामतेकर आणि भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर हे दोघे रात्री साडेअकराच्या सुमारास माझगाव येथे स्विफ्ट कारमधून जात होते. कार थांबली असताना दुचाकीवरून मास्क घातलेले तीन तरुण आले आणि त्यांनी कारवर हल्ला चढवला. या घटनेची माहिती मिळताच अनेक शिवसैनिक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले. याबाबतही भायखळा पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. आमच्या जीवाशी खेळणार असाल तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विरोधकांना दिला होता. मात्र, या हल्ल्यानंतर पक्षप्रमुख काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.


हेही वाचा : शरद पवारांनी डाव साधला आणि शिवसेना फोडली, रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप