विधानसभा उपाध्यक्षांचा हटके अंदाज; पारंपरिक पांडव मुखवटा घालून नृत्य

नरहरी झिरवाळ यांनी पांडवांचा मुखवटा घालत संबळ वाद्यांवर ठेका धरत जिंकली उपस्थितांची मने

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे अक्षय्य तृतीयेपासून पारंपरिक बोहाडा उत्सवास सुरुवात करण्यात आली आहे. या उत्सवाला विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भेट देत पांडवांचा मुखवटा घालत संबळ वाद्यांवर ठेका धरत उपस्थितांची मने जिंकली.

बोपेगाव येथे १०० वर्षांपेक्षा जास्त परंपरा असलेला हा उत्सव पाच वर्षांच्या खंडानंतर यावर्षी सरपंच वसंतराव कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येत आहे. सात दिवसांच्या या दैनंदिन कार्यक्रमात शारजा, गणपती, मच्छ-कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, लक्ष्मण, रावण, गुरुदत्त, शिवशंकर, मोहिनी, भस्मासूर,राजा दशरथ,श्रावणबाळ, श्रीकृष्ण, कंस, अर्जुन, कर्ण, नवनाथ, वेताळ, महिषासूर, देवी, खंडोबा, म्हाळसा यांचे मुखवटे घालून नाचवले गेले.

लयबद्ध संबळवादनाच्या तालावर गावात मिरवून हनुमान मंदिरापुढे त्याची पूजा करण्यात आली. येणाऱ्या प्रत्येक पात्राची पौराणिक ऐतिहासिक माहिती बघण्यासाठी आलेल्या उपस्थितांना गावातील अभ्यासू व्यक्ती भिकाभाऊ कावळे, वसंतराव कावळे, किशोर माळोदे, विश्वनाथ कावळे हे माहिती देतात. हा उत्सव सलग सहा दिवस वेगवेगळ्या पात्रांनिशी चालणार आहे. सातव्या दिवशी सकाळी देवी- महिषासूर या पात्राने बोहाड्याची सांगता होणार आहे. बोपेगावसह पंचक्रोशीतील भाविक बोहाडा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत आहे.