महाराष्ट्राच्या राजभवनात अभ्यासाचं अजीर्ण; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

Sanjay Raut and Bhagat Singh Koshyari

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी टोला लगावला. महाराष्ट्राच्या राजभवनात अभ्यास आणि विद्ववतेचं अजीर्ण झालंय, असा टोला राऊतांनी लगावला. याशिवाय, विधिमंडळाचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना डावलण्यासाठी राज्यपालांची नियुक्ती झाली नाही, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यपालांच्या भूमिकेवर भाष्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना जे उत्तर पाठवलं आहे ते समोर आहे. मी कालही म्हणालो होतो की, राज्यपालांनी इतका अभ्यास करु नये. जे घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यानुसार काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणूक होते. विधानसभेचे हक्क, सरकारच्या शिफारसी, लोकभावना, या डावलून काम करण्यासाठी राज्यपालांची नेमणूक होत नाही. राज्यपाल अभ्यासू आहेत, विद्वान आहेत, पण त्या अभ्यासाचं, विद्वत्तेचं अजीर्ण होऊ नये. सध्या महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये अभ्यासाचं अजीर्ण झालेलं आहे. अजीर्ण झालं की जरा पोटाचा त्रास सुरु होतो. असा त्रास जर काही लोकांना झाला असेल तर महाराष्ट्राचं आरोग्य खातं सक्षम आहे, उपचार करतील, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांबाबत महत्त्वाचं वक्तव्य

राज्याचं अधिवेशन उत्तम पद्धतीनं सुरु झालं. आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री जिथे आहेत तिथून हे अधिवेशन पूर्णपणे नियंत्रित करत आहेत. सरकारच्या कामकाजामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे, वेट अँड वॉच, असं संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – राज्यपाल संविधानाप्रमाणे वागत नसतील तर सरकारने दोन हात करण्याची हिंमत दाखवावी – भास्कर जाधव