Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 राहुल गांधींविरोधात निषेध ठराव आणण्यास विधानसभा अध्यक्षांचा नकार, कारण...

राहुल गांधींविरोधात निषेध ठराव आणण्यास विधानसभा अध्यक्षांचा नकार, कारण…

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | राहुल गांधींविरोधात आज ठराव मांडण्यास राहुल नार्वेकर यांनी नकार दिला. तसंच, सभागृहाच्या आवारात कोणत्याही नेत्याविषयी जोडो मारो आंदोलन करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. 

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अपशब्द वापरणे आणि परदेशात जाऊन भारतीय लोकशाहीविरोधात बोलल्याप्रकरणी राज्याच्या विधिमंडळात आज एकच गोंधळ झाला. सत्ताधाऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरत राहुल गांधींविरोधात निषेध व्यक्त करण्याचा ठराव मांडण्याची मागणी केली. या मागणीसाठी सत्ताधारी पक्षातील सर्व सदस्यांनी राहुल गांधीविरोधात घोषणाबाजीही केली. यादरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृह दोन वेळा स्थगितही करावं लागलं. परंतु, याबाबत आज ठराव मांडण्यास राहुल नार्वेकर यांनी नकार दिला. तसंच, सभागृहाच्या आवारात कोणत्याही नेत्याविषयी जोडो मारो आंदोलन करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

हेही वाचा – मोदी आडनाव बदनामी प्रकरणात राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा; जामीनही मंजूर

- Advertisement -

राहुल गांधींविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आज सभागृहाचं कामकाज सुरू होण्याआधीच सत्ताधारी आक्रमक झाले होते. पायऱ्यांवर उतरत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात जोडो मारो आंदोलन केलं. राहुल गांधींच्या प्रतिमांना जोडो मारल्याने बाळासाहेब थोरात यांनी याविषयी सभागृहात नाराजी आणि संताप व्यक्त केला. कोणत्याही नेत्याला सभागृहाच्या आवारात जोडे मारणे योग्य नाही असं सांगत अशा कृत्यांना आळा घालण्याचे आवाहन बाळासाहेब थोरातांनी केलं. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना आश्वस्त केलं की, “कोणत्याही नेत्याला सभागृहाच्या आवारात जोडे मारणे योग्य नाही. त्यामुळे अशी असंसदीय कार्य यापुढे सभागृहाच्या आवारात होणार नाहीत, याची आम्ही दक्षता घेऊ. परंतु, नेत्यांनी परदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन करू नये, तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधातही गरळ ओकू नये.”

सभागृहात गोंधळ वाढल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप केला. निषेध ठराव मांडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु, राहुल नार्वेकरांनी निषेध ठराव मांडण्यासाठी विरोध केला. सभागृहात निषेध व्यक्त करण्यासाठी योग्य आयुधांचा वापर करा. आज असा कोणताही प्रस्ताव अथवा नोटीस माझ्याकडे आलेली नाही, त्यामुळे असा कोणताही ठराव आज मांडता येणार नाही, असं राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

परदेशात जाऊन भारतीय लोकशाहीविरोधात भाष्य केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. संसदेत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता महाराष्ट्राच्या विधानसभेतही याचे पडसाद उमटले आहेत. राहुल गांधींनी भारतीयांची माफी मागावी अशी आग्रही मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. याप्रकरणी सत्ताधाऱ्यांनी सभागृहात बराच गोंधळ घातला. यामुळे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सभागृह दोनवेळा स्थगित करावं लागलं होतं.

- Advertisment -