घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच विरोधकांचा सभात्याग, शेतकरी प्रश्नांवरून आक्रमक

शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच विरोधकांचा सभात्याग, शेतकरी प्रश्नांवरून आक्रमक

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हमीभावामुळे पिचलेला शेतकरी आता नैसर्गिक संकटात सापडला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकारने त्वरीत मदत जाहीर करावी अशी आक्रमक मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांसह विरोधी बाकावरील अनेक आमदारांनी केली. या मागणीवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत विरोधकांनी आज सुरुवातीलाच सभात्याग केला. विधिमंडळातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच शेतकरी प्रश्नांवरून विरोधकांनी सभात्याग केल्याने आठवड्याचे कामकाज सुरळीत चालतेय का हे पाहावं लागेल.

अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. सात दिवसांनंतरही सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाला तोडगा निघालेला नाही. मोठ्या प्रमाणातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं नुकसान, फळबागांचं नुकसान झालं आहे. शेतकरी आडवा झाला आहे. पंचनामे देखील करायला कोणी नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. या चर्चेच्या निमित्ताने सर्व कर्मचाऱ्यांनाही आवाहन करायचं आहे की तुम्हाला तुमचा हक्क मागण्याचा अधिकार जरूर आहे, पण नैसर्गिक संकटात शेतकरी अडकला आहे त्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या भावनेने कर्मचाऱ्यांनी नोकरीवरून येऊन पंचनामे करावेत, असं अजित पवार म्हणाले. सरकारने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची घोषणा करावी, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनीही केली.

- Advertisement -

गारपिटीने ८ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे. फळबांगांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यावेळी अधिवेशन सुरू असते त्यावेळी लोकांचे लक्ष असते. यातून न्याय मिळेल. शेतकरी अडचणीत आले आहेत. आणि सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता असताना सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी ७५ टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात असे वक्तव्य केले. अशा पध्दतीने सर्व कर्मचार्‍यांना एका रेषेत धरणार तर कामे कशी होणार असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.

काही तालुक्यात शाळा पालक आणि लोकं चालवत आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

- Advertisement -

गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाला आहे. संप सुरू आहे. पंचनामे करायला कोण नाही. महसुल नियमानुसार आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी. आणि वाटप सुरू करावे. आजच्या आज उपाययोजना करावी. तात्काळ निर्णय करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केली

संबंध देशात उघड्या आभाळाखाली व्यवसाय करणाऱ्यांची जात शेतकऱ्याची आहे. आभाळ फाटलंय म्हणून शेतकऱ्याचं नशिब फाटलंय. मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मागचे अनुदानही मिळालेले नाही. सरकार अनुदान जाहीर करतं पण सरकाराला काही मिळत नाही. आजचं सर्व कामकाज बाजूला सारून शेतकरी प्रश्नावर चर्चा व्हावी अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पंचनामे करण्यास कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्याची भूमिका घेतली आहे. आज किंवा उद्या पंचनामे पूर्ण होतील. कर्मचाऱ्यांनी पंचनामे करण्यास नकार दिलेला नाही. पंचनाम्याबाबत अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतर नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, अशी भूमिका महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केली.

विनाकारण राजकारण करू नका, बेछुट आरोप करू नका, असं आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना केलं. संपावर असलेले कर्मचारी नुकसानीचे पंचनामे करायला तयार झाले आहेत. येत्या एक दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होतील, पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसान भरपाई जाहीर केली जाईल, असंही ते म्हणाले.

गंभीर प्रश्नाच्या संदर्भात विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र यावं. सरकारी कर्मचाऱ्यांनीही सहकार्य करावं. गंभीर विषयावर राजकारण करून, सभात्याग करून हे प्रश्न सुटणार आहे. चिंतन, मनन करून हे प्रश्न सुटणार आहे. या संकटात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहील. विरोधकांनी पाठीशी उभे राहावं, असा आदर्श निर्माण करावा. आजच्या बैठकीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन सर्व प्रश्नांवर चर्चा करावी, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -