शिंदे गट-भाजपासोबतच्या युतीत डावललं जातं, अखेर आठवलेंनी व्यक्त केली खंत

Ramdas Athawale on alliance | महाबळेश्वर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पदाधिकारी आणि नेत्यांसाठी एक दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ramdas athawale

महाबळेश्वर – वंचित आणि शिवसेनेच्या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही बदल होणार नाही असं वक्तव्य करणाऱ्या रामदास आठवले यांनी आता त्यांच्याच महायुतीबाबत नाराजी उघड केली आहे. शिंदे गट, भाजपा आणि रिपब्लिकन पक्ष अशी ही युती असली तरीही युतीबाबत बोलताना नेहमी शिंदे आणि भाजपाचंच नाव घेतलं जात, आपल्याला डावललं जातं, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर येथे भरवण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या अभ्यास शिबिरात ते बोलत होते.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आम्ही भाजप व शिंदे गटासोबत आहोत. वैचारिक मतभेद असले तरी आमचे सत्तेपर्यंत पोहोचण्याचे मिशन आहे. सत्तेच्या माध्यमातून अनेक लोक भेटतात. त्यांची कामे होतात. त्यामुळे सत्ता आवश्यक आहे. मात्र, आपण चळवळीचे काम थांबवता कामा नये, चळवळ जिवंत ठेवली पाहिजे. दलित व आदिवासींना खासगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. महत्त्वाच्या मागण्या व प्रश्नांवर राष्ट्रीय समितीमध्ये चर्चा करून दिशा ठरविण्याची गरज आहे,’ असं रामदास आठवले म्हणाले.

हेही वाचा – शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, रामदास आठवले म्हणतात उद्धव ठाकरेंची शक्ती कमी झाल्याने…

ते पुढे म्हणाले की, “आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपल्याला भाजपा आणि ‘बाळासाहेबांची शिवसेने’सोबत (शिंदे गट) राहायचे आहे. त्यांनी सुद्धा आपले नाव घेणे आवश्यक आहे. मात्र, भाजप व एकनाथ शिंदे यांच्याकडून रिपब्लिकन पक्षाचे नाव विशेष करून घेतले जात नाही. डावलले जात आहे.”

महाबळेश्वर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पदाधिकारी आणि नेत्यांसाठी एक दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, सीमाताई रामदास आठवले, प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, केंद्रीय महासचिव अविनाश महातेकर, सरचिटणीस गौतम सोनावणे, कार्याध्यक्ष बाबूराव कदम, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष अशोक गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.


वंचित-शिवसेनेच्या युतीवर केली होती टीका

“उद्धव ठाकरे शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन युतीचा राज्याच्या राजकारणात काहीही फरक पडणार नाही. उद्धव ठाकरे यांची शक्ती कमी झाली आहे. त्यामुळे ते पर्याय शोधत आहेत आणि म्हणून त्यांनी वंचितशी युती केली आहे. यापूर्वी २०१४ च्या निवडणुकीमध्ये भीमशक्ती आणि शिवशक्ती महायुतीत भाजपसोबत एकत्र आले. त्यावेळी आम्ही भरपूर जागाही जिंकलेलो आहोत,” असं रामदास आठवले यांनी म्हटले होते.