घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हल्ला

Subscribe

राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा होत असताना गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी बुधवारी दुपारी कुरखेड्याजवळच्या गावात भूसुरूंग स्फोट केला. त्यात १५ जवान शहीद झाले आहेत. हे सर्व जवान सी-६० कमांडो पथकाचे होते. हा हल्ला गडचिरोलीच्या उत्तरेला महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ झाला. एका खासगी बसमधून पोलीस जात असताना नक्षलवाद्यांनी लेंदारी पूल येथे रस्त्यावर भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. कमांडो पथकावर नक्षलवाद्यांची अगोदरच पाळत ठेवली होती.या हल्ल्यात बसचा ड्रायव्हरही ठार झाला. या स्फोटाअगोदर नक्षलवादी आणि जवानांमध्ये काही काळ चकमक झाल्याचे समजते.देशभरात सर्वत्र नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे.

गडचिरोलीमध्ये गेल्या दहा वर्षांत झालेले मोठे नक्षलवादी हल्ले

♦३ एप्रिल २०१८ : गडचिरोलीच्या भामरागड जंगलात नक्षलवाद्यांनी पोलीस पेट्रोलिंग पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. तर चार जवान जखमी झाले.

- Advertisement -

♦३ मे २०१७ : नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये रात्रीच्यावेळी पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी केलेल्या सुरुंगस्फोटात पोलिसांची कमांडो व्हॅन उद्ध्वस्त झाली. या स्फोटात १९ पोलीस जखमी झाले. तर सुरेश तेलामी नावाचा पोलीस शहीद झाला.

♦११ मे २०१४ : गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात ७ पोलीस कमांडो शहीद झाले.

- Advertisement -

♦८ ऑक्टोबर २००९ : माओवादी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी पोलीस ठाण्यावर रात्रीच्यावेळी हल्ला केला. त्यात १७ पोलीस शहीद तर अनेक जखमी झाले.

♦२२ मे २००९ : नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकावर रात्रीच्या सुमारास भ्याड हल्ला केला. लपून बसलेल्या १०० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांनी बेसावध पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात १६ पोलीस शहीद झाले.

गडचिरोलीत कोम्बिंग ऑपरेशन सुरू

माओवाद्यांच्या हल्ल्यानंतर पोलीस आणि जवानांनी या भागात कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. पोलीस संचालक म्हणून मी आणि आमची टीम त्या ठिकाणी जाणार असल्याची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. जंगलाचा अभ्यास करून मग आम्ही योग्य ती कारवाई करू. आमची पथके घटनास्थळी पोहोचतील आणि त्यानंतर माहिती घेऊन पुढची पावले उचलली जातील. या हल्ल्याचा थेट निवडणुकांशी संबंध लावता येणार नाही. अडीच तासांत जेवढी माहिती आमच्यापर्यंत आली ती आपल्यासमोर मांडत आहे. आम्ही कायमच दक्ष होतो. आमच्याकडे निवडणूक काळात अशा घटना घडण्याची शक्यता असल्याची माहिती होती, मात्र तसे काही झाले नाही, असेही जयस्वाल म्हणाले.

ही घटना दुर्दैवी आहे, अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही दक्ष राहू. पूर्ण ताकदीनिशी आम्ही नक्षलवाद्यांचा बिमोड करू. जवान या भागातून जात असताना सर्व तयारी केली होती. माओवाद्यांविरोधात आम्ही कडक कारवाई करणार आहोत. १५ जवान शहीद झाले आणि एका वाहन चालकाचा मृत्यू झाला. खुराडा पोलीस ठाण्याकडे जात असताना भूसुरुंगाचा स्फोट झाला. कुरखेडा पोलिसांचे हे पथक होते. नक्षलवाद्यांचा भ्याड हल्लाच म्हणावा लागेल असे पोलीस महासंचालक म्हणाले. बुधवारी दुपारी १२.३० वाजता क्विक अ‍ॅक्शन टीम (क्यूआरटी) वाहनातून प्रवास करत असताना नक्षल्यांनी हा भ्याड हल्ला केला, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नक्षलींना धडकी भरवणारे सी-६० कमांडो

माओवाद्यांच्या हल्ल्यात सी-६० कमांडो पथकाचे १५ जवान शहीद झालेत. गडचिरोलीतील माओवाद्यांच्या कारवाया हाणून पाडण्याचे काम सी-६० हेे कंमाडो करतात.
♦ १९९२ साली सी-६० कमांडो पथकाची स्थापना गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधीक्षक के पी रघुवंशी यांनी केली होती. रघुवंशी यांच्या संकल्पनेतून हे पथक निर्माण झाले आहे.
♦सी-६० कमांडोंच्या प्रत्येक गटात ६० जवान असतात.
♦ सात-आठ दिवस सलग जंगलात राहून नक्षलवाद्यांशी लढू शकतात.
♦ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे त्यांना प्रशिक्षण दिलेले असते.
♦ या कमांडोंकडे बंदूका, शस्त्रांसोबतच जीवनावश्यक वस्तू असतात.
♦ या पथकातील सर्व जवान स्थानिक आदिवासी आहेत.
♦ या कमांडोंना गडचिरोलीच्या जंगलाची खडान्खडा माहिती असते.

शहीद झालेले जवान

१) पोलिस शिपाई साहुदास बाजीराव मडावी रा. चिखली ता. कुरखेडा, 2) प्रमोद महादेवराव भोयर, देसाईंगज, 3) राजु नारायण गायकवाड मेहकर जि. बुलढाणा, 4) किशोर यशवंत बोबाटें आरमोरी जि. गडचिरोली, 5) संतोष देविदास चव्हाण ब्राम्हणवाडा ता. औंध जि. हिंगोली, 6) सर्जेराव एकनाथ खरडे आळंद ता. देउळगाव राजा जि. बुलडाणा. 7) दयानंद ताम्रध्वज शहारे, रा. दिघोरी मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा, 8) भुपेश पांडुरंग वालोदे, लाखनी जि. भंडारा, 9) आरिफ तौशिब शेख रा. पाटोदा जि. बिड, 10) योगाजी सिताराम हलामी रा. मोहगाव ता. कुरखेडा, 11) पुरणशहा प्रतापशहा दुगा, भाकरोंडी ता. आरमोरी जि. गडचिरोली, 12) लक्ष्मण केशव कोडापे, रा. बेंगलखेडा ता. कुरखेडा, 13) अमृत प्रभुदास भदाडे रा. चिंचघाट ता. कुही जि. नागपूर, 14) अग्रमान बक्षी रहाटे, रा. तरोडा ता. आर्णी जि. यवतमाळ, 15) नितीन तिलकचंद घोडमारे रा. कुंभाली ता. साकोली जि. भंडारा, 16) दादुभाऊ सिंगनाथ, वाहन चालक, रा. कुरखेडा.

सर्वच शूरवीर जवानांना मी सलाम करतो. त्यांचे बलिदान कधीही विसरता येणारे नाही. मी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहे. जवानांचे वाहन घातपात करून उडवून देणार्‍या ‘त्या’ नक्षलवाद्यांना सोडणार नाही.-नरेंद्र मोदी,पंतप्रधान.

मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. माझ्या भावना शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत आहेत. आम्ही माओवाद्यांशी अधिक सशक्तपणे लढा देऊ.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

ज्यांना जनाची नाही तरी मनाची लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता; पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही. राज्यकर्त्यांचा निर्ढावलेपणा लक्षात घेता, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय सध्यातरी दुसरा पर्याय उरत नाही.    -शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -