एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसेंवरील भ्याड हल्ल्याचे विधानसभेत उमटणार पडसाद

attack on ncp leader eknath khadse daughter rohini khadse car at jalgaon mla Chandrakant patil demanding enquiry in maharashtra assembly
एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसेंवरील भ्याड हल्ल्याचे विधानसभेत उमटणार पडसाद

जळगाव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवळकर यांच्या चारचाकीवर अज्ञात इसमांनी सोमवारी रात्री हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामुळे जळगावातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असून सर्वत्र निषेध केला जात आहे. तसेच रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उमटणार आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील या हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार आहेत.

नक्की काय घडले?

एका हळदी समारंभाच्या कार्यक्रमानंतर चांगदेव येथून रोहिणी खडसे मुक्ताईनगरकडे परतत होत्या. याच दरम्यान दोन मोटार सायकलवरून आलेल्या चार अज्ञातांनी सूतगिरणी परिसरात रोहिणी खडसे यांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यानंतर रॉडने रोहिणी खडसेंच्या वाहनावर हल्ला केला. यावेळेस चालकाने वाहन रस्त्यावरून बाजूला नेऊन रोहिणी खडसेंसह पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसेंसह चालक या हल्ल्यातून सुखरुप बचावल्याची माहिती खडसे कुटुंबियांनी दिली. तसेच अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून हल्लेखोर पसार झाले. गेल्या काही आठवड्यापासून मुक्ताईनगरमध्ये अवैध धंद्याविरोधात रोहिणी खडसेंनी आवाज उठविला असल्यामुळे हा भ्याड हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान रोहिणी खडसेंवरील हल्ला प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधानसभेत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील करणार आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘रोहिणी खडसेंच्या वाहनावरील झालेल्या भ्याड हल्लाचा निषेध करतो. हे हल्ला प्रकरण विधानसभेत मांडणार असून याप्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.’


हेही वाचा – नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज