घरमहाराष्ट्रधक्कादायक.. लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न; मुंब्रा रेल्वे स्थानकातील घटना

धक्कादायक.. लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न; मुंब्रा रेल्वे स्थानकातील घटना

Subscribe

मुंबईतील लोकलमध्ये एका दिव्यांगाला सहप्रवाशी दिव्यांगाकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिव्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये शुक्रवारी रात्री मुंब्रा रेल्वे स्थानक येथे ही घटना घडली.

मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकल पोहोचल्यावर एका दिव्यांगाने पेटता रुमाल दिवा येथील प्रमोद वाडेकर नामक दिव्यांग सहप्रवाश्याच्या अंगावर फेकल्याची घटना काल शनिवारी (ता. २५ मार्च) रात्री घडली. यामध्ये वाडेकर यांच्या दोन्ही हाताला भाजले असून त्यांना उपचारार्थ मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर पेटता रुमाल फेकणाऱ्या गर्दुल्ल्याचा मिळलेल्या सीसीटीव्ही फुटेज नुसार शोध सुरू आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.

जखमी वाडेकर हे दिव्यातील रहिवाशी आहेत. तसेच पवई येथे एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे कांजूर मार्ग येथून लोकलमध्ये बसून घरी येत होते. तर फरार असलेला दिव्यांग हा आधीपासूनच दिव्यांग डब्ब्यात बसला होता. पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकात पोहोचली. त्यावेळी वाडेकर यांच्या अंगावर फरार असलेल्या सहप्रवासी दिव्यांगाने त्याच्याकडील रुमाल पेटवून फेकला. तो रुमाल वाडेकर यांच्या डाव्या हातावर जाऊन पडला. आग लागल्याची बाब वाडेकर यांना अन्य एका सहप्रवासी याने सांगितली आणि त्यानंतर हे दोघे मिळून ती आग विझवू लागले. याचदरम्यान वाडेकर यांच्या डाव्या हाताच्या पंजाला आणि उजव्या हाताला दुखापत झाली. तर रुमाल फेकणारा दिव्यांग हा त्याचवेळी लोकलमधून मुंब्रा रेल्वे स्थानकात उतरून पसार झाला.

- Advertisement -

दरम्यान, ही बाब लोहमार्ग पोलिसांना समजताच वाडेकर यांना दिवा रेल्वे स्थानकात उतरवून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना केईएमला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी भादवी कलम ३२६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पसार झालेल्या अनोळखी दिव्यांग याचे रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्याच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे. मात्र हा प्रकार नेमका कशामुळे घडला? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. तर त्या पसार दिव्यांगाचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.


हेही वाचा – मुंबईत पुन्हा अग्नितांडव, कांजूरमार्गमध्ये इमारतीला भीषण आग, ५ महिला जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -