मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री ठाकरे सुरक्षा यंत्रणांवर भडकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी देहूतून मुंबईकडे रवाना झाले होते. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयएनएस शिक्रा येथे पोहोचले होते. मात्र, त्यांच्यासोबत कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा होते. पंतप्रधान आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सुरक्षा यंत्रणांवर असते. त्यामुळे सुरक्षेच्या आणि प्रोटोकॉलच्या नावाखाली आदित्य ठाकरे यांना गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी केला. त्यानंतर उद्धव ठाकरे हे सुरक्षा यंत्रणांवर भडकले.

ज्यावेळी पंतप्रधानांचा ताफा शिक्रा पॉईंटवरून बाहेर पडला. त्यानंतर दोन ते तीन मिनिटांनंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा बाहेर पडला. यादरम्यान हा प्रसंग घडला. आदित्य ठाकरे हे राजशिष्ठाचार मंत्री आहेत, त्यामुळे ते तिथे उपस्थित राहणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा यंत्रणांनी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केल्यामुळे उद्धव ठाकरे सुरक्षा यंत्रणांवर संतापले.

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी बऱ्याचदा मुख्यमंत्री जात नाहीत, अशा वेळीस आदित्य ठाकरे राजशिष्ठाचार मंत्री म्हणून स्वागतासाठी जातात. परंतु यावेळेस सुरक्षा यंत्रणांनी त्यांना गाडीतून उतरवण्याचा प्रयत्न केल्यामुळे मुख्यमंत्री सुरक्षा व्यवस्थेवर संतापले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन केलं आहे. जल भूषण इमारत हे १८८५ सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. जुनी इमारत पाडून नवी इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, या उद्घाटनानंतर ते वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होणार आहेत.


हेही वाचा : पालखी मार्गांसाठी ११ हजार कोटींचा निधी, नरेंद्र मोदींचे वारकऱ्यांना आश्वासन