भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर मध्यरात्रीच्या सुमारास हल्लाचा प्रयत्न झाला. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर जगड, क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर काही शिवसैनिक हे आक्रमक झाले असून त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आहे. या प्रकरणी हल्लेखोरांवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तसेच कोणाच्या आदेशानुसार भास्कर जाधव यांची सुरक्षा काढण्यात आली असा सवाल देखील पोलीस अधिकाऱ्यांना शिवसैनिकांनी विचारला.

भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला झाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. त्यामुळे जय भवानी जय शिवाजी…अशा घोषणा देत हा मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकला. काल मध्यरात्री भास्कर जाधव यांच्या घराबाहेर पेट्रोल, बॅट्स, स्टंम्प आढळून आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

चिपळूण पोलिसांनी भास्कर जाधव यांच्या घरी भेट देत घराच्या आवारात सापडलेल्या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. अज्ञातांनी केलेला हल्ल्याचा प्रयत्न निष्फळ ठरला असला तरी या गंभीर प्रकाराची दखल पोलिसांनी मात्र तात्काळ घेतली आहे. परंतु जाधवांची सुरक्षा काढून घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी घरावर हल्ला झालेल्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

भास्कर जाधव यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी भास्कर जाधव यांच्या विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात तेढ होईल अशी वक्तव्य करणे, वाहतुकीस अडथळा करणे, मशाली सारखी ज्वालाग्राही वस्तू घेऊन फिरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या सभेत जाधव यांनी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपाने केली होती.


हेही वाचा : कल्याणमध्ये औद्योगिक ग्राहकाकडून १७ लाखांची वीजचोरी, महावितरणच्या पथकाकडून पर्दाफाश