घरमहाराष्ट्रदेव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न, तैलचित्राचे ढोंग कशासाठी? शिवसेनेची आगपाखड

देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न, तैलचित्राचे ढोंग कशासाठी? शिवसेनेची आगपाखड

Subscribe

शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला, असं यासामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मुंबई  – शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत, असा हल्लाबोल करत शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्र अनावरणाचे जे ढोंग रचले गेले आहे ते कशासाठी? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून अशी टीका करण्यात आली आहे.

हेही वाचा – बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार?

- Advertisement -

सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्राला ढोंग मान्य नाही. शिवसेनाप्रमुख तर नेहमीच ढोंगबाजांच्या कंबरडय़ात लाथा घालीत राहिले. ढोंगबाजांचे मुखवटे त्यांनी जाहीरपणे फाडले, पण गेल्या पाचेक महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

‘होय, होय, आम्ही मोदींची म्हणजे मोदींची माणसं आहोत?” इतके सर्व स्पष्ट झाल्यावर लोकांना कळलेच असेल की, शिवसेना खतम करण्याचे किती मोठे कारस्थान भाजप व त्यांच्या हस्तकांनी रचले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कबुलीच दिली, ”आमचे नाते मोदींशी!” मग बाळासाहेबांचे नाव का घेता व विधानसभेत शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्र अनावरणाचे जे ढोंग रचले गेले आहे ते कशासाठी? एकतर तैलचित्रात निष्ठेच्या तेजाचा अंश नाही व ज्या महाराष्ट्राच्या विधानसभेत शिवसेनेच्या बाबतीत बेइमानी केली, त्याच विधानसभेत तैलचित्र लावून महाराष्ट्रापुढे कोणते चित्र रंगवीत आहात? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हा अराजकीय कार्यक्रम.., बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याबाबत राहुल नार्वेकरांचं वक्तव्य

शिवसेनेच्या नावावर उतलेले-मातलेले मंबाजी, त्या मंबाजी मंडळाचे ‘खोके’ राजकारण, त्या राजकारणातून सुरू असलेली महाराष्ट्राची बदनामी, त्या बदनामीतून खचलेल्या मराठी मनास उभारी देण्याचे काम शिवसेनेला करावे लागेल. मंबाजीचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे आहे व उद्याचे भविष्य शिवसेनेचे आहे या विचाराचा निर्धार आजच्या दिवशी करणे गरजेचे आहे. मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण आपला बाप व पाठीराखा दुसराच कोणी असल्याचा दावा त्यांनी परदेशात केला. पुन्हा मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले, ”आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. वाघांच्या झुंडीत शिरलेली आम्ही मेंढरं आणि कोल्हे होतो. आम्ही वाघाचे कातडे पांघरून तेथे होतो, पण ईडी वगैरे लोकांनी आमचे कातडे ओढून काढले. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच!” अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हरामखोरांची राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली!, असंही या अग्रलेखात म्हटलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -